विरोधी पक्षाला संपविण्याचा मोदी सरकारचा डाव. – सचिन सावंत.

437
नांदेड –
राजकीय पक्षांच्या देणग्यांमध्ये गेल्या काही वर्षापासून भाजप पक्षाच्या देणग्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तर विरोधी पक्षांच्या देणग्या मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. याच पद्धतीने इलेक्टोरल फंड्स योजना ही विरोधी पक्षांना कोणत्याही परिस्थितीत उद्योजकांकडून देणग्या मिळू नयेत म्हणून राबवण्यात आली हे उघड गुपित आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडमध्ये काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
यावेळी सावंत म्हणाले की, भारतीय उद्योगांनी ज्याला अर्थपुरवठा केला आहे अशा गडगंज ‘प्रूडंट इलेक्टोरल फंड’ च्या देणग्यांचा निवडणूक आयोगाला नुकताच दिलेला हिशोब बघितला तर त्यात जमा झालेल्या एकूण 245.70 कोटी रूपये निधीतून भाजपाला तब्बल 209 कोटी रुपये आणि भाजपाच्या सहयोगी जदयुला 25 कोटी रुपये दान करण्यात आले तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला फक्त 2 कोटी रुपये मिळाले. भाजप व मित्रपक्षाला मिळून 234 कोटी म्हणजेच 95.23% मिळाले तर विरोधी पक्षांना फक्त 4.77% मिळाले. या निधीतून आप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद व लोकजनशक्ती वगळता इतर सर्व पक्षांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
त्यामुळे येनकेन प्रकारे विरोधी पक्षाला संपविण्याच्या डाव हा एकच अजेंडा राबविणाऱ्या मोदी सरकारमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. मोदी सरकारने संविधान दिन साजरा करणे हा पराकोटीचा ढोंगीपणा आहे कारण त्यांनीच लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान केला आहे असेही सावंत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.