शरद पवारांची थेट बाबासाहेबांच्या संविधानाची तुलना केल्याने एमजीएम जर्नालिझमच्या प्राचार्या वादात !

570
औरंगाबाद –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना औरंगाबादच्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांनी शरद पवारांची थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी तुलना केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून डॉ.रेखा शेळके यांनी बिनशर्त माफी मागावी,अशी मागणी आंबेडकरी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
शरद पवार यांचा काल १२ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त देशभरातील विविध समाज घटकातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनतेकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. औरंगाबादच्या एमजीएमजी पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांनीही पवारांना शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांच्या फेसबुक टाकली.
सोशल इंजिनिअरिंगचे व्हील तुम्ही…
गांधीजीची काठी तुम्ही
आंबेडकरांचे संविधान तुम्ही.
साहेब वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
असे प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले. या फेसबुक पोस्टसोबत त्यांनी त्या स्वतः शरद पवारांना पुस्तक भेट देत असल्याचा फोटोही शेअर केला. विशेष म्हणजे पत्रकारिता विषयात पीएच. डी. मिळवलेल्या डॉ. शेळके यांच्या मूळ फेसबूक पोस्टमध्ये मराठी व्याकरणदृष्ट्या अनेक चुका आहेत. या पोस्टमध्ये इंजिनिअरिंग हा शब्दही नीटही लिहिलेला नाही व व्हाल हा शब्द लिहतानाही चूक झाली आहे. मात्र डॉ. रेखा शेळके यांनी या पोस्टमध्ये शरद पवारांची थेट बाबासाहेबांच्या संविधानाशी केलेली तुलना आंबेडकरी जनतेला पटली नाही. त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप घेत तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशीच शरद पवारांची तुलना करून एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बाबासाहेब आणि संविधानाचीही अनादर केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंबेडकरवादी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांची हीच ती मूळ वादग्रस्त पोस्ट.
वादाला तोंड फुटताच हटवली पोस्ट
शरद पवारांची थेट बाबासाहेबांच्या संविधानाशी तुलना केल्यामुळे एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून झाल्यानंतर सोशल मीडियावर आंबेडकरी नेटकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी त्यांची मुळ पोस्टच डिलिट करून टाकली आहे. पोस्ट डिलिट करण्याआधी त्यांनी त्यात सुधारणाही केल्या होत्या. ‘सोशल इंजिनिअरिंगचे व्हील तुम्ही…गांधीजींच्या विचारांनी चालणारे तुम्ही, बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारे तुम्ही…साहेब वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा’ अशी दुरूस्ती त्यांनी केली होती. तरीही नेटकऱ्यांच्या संताप थांबत नसल्याचे पाहून त्यांनी नंतर ही पोस्टच डिलिट करून टाकली. मात्र असंख्य नेटकऱ्यांनी या पोस्टचे स्क्रीन शॉट्स काढून ठेवले असून डॉ. रेखा शेळके यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संविधानाचा अनादर केला म्हणून आंबेडकरी जनतेच्या रोषाला आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहावे, असे इशारे देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.