सरकार सणांच्या विरोधात नाही, तर कोरोनाच्या विरोधात- मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला.

410

मुंबई-

महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जे नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल.केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.मात्र कोरोनाचे संकट दिसत असताना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत,जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या शंखनाद आंदोलन आणि जन आशिर्वाद यात्रेवर निशाणा साधला.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळअष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते त्यास प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे.तो थरार, तो उत्साह मला अजूनही आठवतो. परंतू आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख.त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम असल्याचे सांगत दुर्देवाने आज मात्र १०० टक्के राजकारण केले जात आहे असे नाव न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत,जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जिविताचा प्रश्न आहे अशा शब्दात त्यांनी भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेवर नाराजी व्यक्त केली.कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे.जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.