सरपंचानंतर आता बळीरामपूरच्या ‘उप’सरपंच यांच्या विरोधातही ‘अविश्वासा’चा ठराव पारित.
नांदेड –
बळीरामपूर येथील ग्राम पंचायतचे लोकनियुक्त सरपंच अमोल गोडबोले यांच्यानंतर आता येथील उपसरपंच सागरबाई विठ्ठल वाघमारे यांच्या विरोधातही २४ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष ग्राम सभेत १४ ग्रा. पं. सदस्यांनी हात उंचावून अविश्वासाचा ठराव पारित केला आहे.
बळीरामपूर येथील ग्राम पंचायतचे लोकनियुक्त सरपंच अमोल पांडुरंग गोडबोले यांच्या विरोधातील अविश्वासाच्या ठरावासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी जि.प. प्राथमिक शाळा, बळीरामपूर येथे विशेष ग्रामसभेच्यानंतर मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत ‘गुप्त’ मतदान पध्दतीने अर्थातच मतपत्रिकेद्वारे १ हजार ११ विरूद्ध ९४० अशा मतांच्या फरकाने सरपंच अमोल गोडबोले यांच्या विरोधातील अविश्वासाच्या ठरावावर अखेर जनतेकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तदनंतरच सरपंच अमोल गोडबोले यांना अखेर बळीरामपुर येथील सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. ही घटना ताजी असतानाच बळीरामपूर येथील १४ ग्रा. पं. सदस्यांनी ‘उप’सरपंच सागराबाई विठ्ठल वाघमारे यांच्या विरोधातही २१ सप्टेंबर रोजी नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांच्या कार्यालयात ‘अविश्वासा’चा ठराव दाखल केला होता. उपसरपंच सागरबाई वाघमारे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केलेल्या ग्रा.पं. सदस्यांमध्ये अशोक आनंदा वाघमारे, धम्मदिप रामा एंगडे, अनुराधा किशनराव गव्हाणे, शुध्दोधन निवृत्ती एंगडे, विजय यशवंत हाटकर, इंद्रजित जळबा पांचाळ, शेख सलीम शेख राजेसाहेब, मधुकर गणपत आढाव, सागरबाई माधव जाधव, प्रयागबाई किशन धोतरे, गुणाबाई संभाजी पंडीत, उर्मिला गणेश जिंदम, रंजनाबाई संजय सोनकांबळे आणि राधेश्याम गोविंद सुंकेवार यांचा समावेश असल्याचे विश्वसनीय अर्थातच खात्रीशीर वृत्त आहे.
दरम्यान, बळीरामपूर ग्रा.पं.च्या उपसरपंच सागराबाई वाघमारे यांच्या उपरोल्लेखित ‘ठरावा’संदर्भात २४ सप्टेंबर रोजी ग्रा.पं. कार्यालयात तहसीलदार किरण अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेला १५ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दरम्यान, विशेष ग्रामसभेत १५ पैकी १४ ग्रा. पं. सदस्यांनी हात उंचावून ‘उप’सरपंच सागराबाई वाघमारे यांच्या विरोधातील म्हणजेच अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने मत प्रदर्शित केले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी तसेच नांदेड येथील नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी आणि मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर यांच्यासह तलाठी मंगेश वांगीकर, तलाठी प्रदीप पाटील – उबाळे व बळीरामपूर येथील ग्रामसेवक रंजीत हाटकर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
याशिवाय, या प्रक्रियेदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोउपनि. महेश कोरे, पोउपनि. विजय पाटील, पोउपनि. बालाजी नरवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामराव केंद्रे, बालाजी लाडेकर व पोलीस नाईक रामचंद्र पवार, नागनाथ दिपके, प्रल्हाद ईमडे, सुरेश कांबळे, पो.कॉ. तानाजी चाटे, उध्दव पवार, रेणुप्रसाद भोपाळकर, महिला पो. कॉ. अनिता वाडीकर आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनीही बळीरामपूर येथील ग्रा.पं. कार्यालयाच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.