सांस्कृतिक कार्यक्रमाला बगल देत गणेश मंडळांनी साजरा केला माहूर मध्ये लसीकरण उत्सव.

कोविशिल्ड लसीच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक गेले परत.

227

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

माहूर शहरातील विविध गणेश मंडळानी काल मराठवाडा
मुक्तीसंग्राम दिनी लसीकरण शिबिर आयोजित करून शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेत लसीकरणाचा उत्सव साजरा केला. शहरातील विविध वार्ड मध्ये असलेल्या गणेश मंडळासमोर काल लसीकरणासाठी रांगा होत्या, मात्र आज लसीचा तुटवडा झाल्याने काही नागरिकांना लस न घेता परत जावे लागले. त्यामुळे कोविशिल्ड लसीचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी विर गणेश मंडळाचे संयोजक प्रमोद राठोड यांनी केली आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी 75 हजार लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेतला होता, तर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून गणेश मंडळांनी लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते.त्या आवाहानाला प्रतिसाद देत माहूर मध्ये नगरपंचायत, नवी आबादी शाळा, ग्रामीण रुग्णालय,वक्रतुंड गणेश मंडळ,साईश्रध्दा गणेश मंडळ,जयभवानी गणेश मंडळ, वसमतकर महाराज मठ, बस स्थानक,या एकूण आठ ठिकाणी १०५५ नागरिकांनी लसीकरण करून घेतले तर आज दिनांक १८ रोजी विर गणेश मंडळ येथे १६० नागरिकांनी लसीकरण करून घेतले. मात्र ११३ नागरिकांनी दुसऱ्या डोससाठी नाव नोंदणी केली असताना कोविशिल्ड लसीच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक लस न घेता परत गेले. नांदेड जिल्ह्यात लसीकरणाच्या बाबतीत माहुरचा शहरी विभाग खालून पहिल्या क्रमांकावर आहे. एकीकडे नागरिकांच्या मनातील भीती निघून लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे म्हणून गणेश मंडळांनी आपापल्या भागात जनजागृती करून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले.तर लसीकरणात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घ्यावा म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक फिरोज दोसानी यांनी जोडीने लसीकरण करून घेणाऱ्या नवरा बायको यांना साडी चोळी तर इतर लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकासाठी थंड पाण्याची बाटली भेट दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन लसीकरणाला मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे मात्र कोविशिल्ड लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना परत जावे लागले.असे असले तरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन.भोसले यांनी शर्थीचे प्रयत्न करून उद्यापर्यंत सदर लस उपलब्ध करून देण्याची हमी घेतल्याने विर गणेश मंडळापुढे उद्या रविवारी सुद्धा लसीकरण शिबिर घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संतोष कमठेवार यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.