स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नांदेडला निर्मित झालेला राष्ट्रध्वज डौलाने फडकणार..!
नांदेड-
संपूर्ण देशवासियांसाठी अभिमान असलेला भारताचा तिरंगा हा देशात दोनच ठिकाणी तयार होतो. एक मराठवाड्यातील नांदेडच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत आणि दुसरा कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील हुबळी येथील संस्थेत.यावर्षीचा लाल किल्ल्यावर फडकणारा देशाचा राष्ट्रध्वज हा नांदेडमधून गेला आहे.उद्या तो डौलाने राजधानीत फडकणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यासाठी देशातील दोन शहरांची निवड करण्यात आली. नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग संस्था आणि कर्नाटक राज्यातील हुबळीची एक संस्था या संस्थेत तयार झालेले राष्ट्रध्वज दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यात जातात. महाराष्ट्र, दिल्ली,पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, हिमाचल प्रदेश,तेलंगणा,आंध्रप्रदेश, या राज्यात त्याचे वितरण होते. दरवर्षी दीड ते अडीच कोटी रुपयांचे ध्वज देशभर वितरीत केले जातात मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे राष्ट्रध्वजांची विक्री घटून 50 टक्के एवढीच झाल्याची माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी दिली.
14 बाय 21 फुट या आकाराचा असलेला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर, राष्ट्रपती भवनात, राज्याच्या मंत्रालयावर डौलाने फडकत असतो. उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर देखील नांदेड येथे तयार झालेला देशाचा राष्ट्रध्वज डौलाने फडकणार आहे. जिल्हास्तरी कार्यालय व ग्रामपंचायतीच्या कार्यालयापर्यंत 8 बाय 12 आणि 6 बाय 9 या आकाराचे राष्ट्रध्वज ठरलेले असतात. त्याची विक्रीही नांदेडच्याच केंद्रातून होत असते. येथूनच हे ध्वज वितरीत केले जातात.
हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1967 साली मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. मराठवाड्यात तेलंगणा आणि कर्नाटकात त्यांनी याच्या शाखाही सुरु केले. सरदार वल्लभभाई पटेल या संस्थेचे मार्गदर्शक होते तर देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी या संस्थेत संस्थापक सदस्य म्हणून काम पाहिले आहे. या संस्थेच्या अंतर्गत सातशेहून अधिक कारागीर काम करीत असून,चार मोठी उत्पादन केंद्र व नऊ उपकेंद्राच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योगचा कारभार चालतो.
देशाला राष्ट्रध्वज देणारी ही संस्था सध्या मोठ्या आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करत आहे.अशाही परिस्थितीत उत्पादनात खंड न पडू देता वेगवेगळी उत्पादने या खादी ग्रामोद्योगातून तयार होतात. उद्या देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावर नांदेडचाच राष्ट्रध्वज डौलाने फडकणार असून, नांदेडकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी दिली.