स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या नागरीकांना शुभेच्छा.

नांदेडचे श्री गुरू गोविंदसिंघजी रुग्णालय 100 खाटांऐवजी आता 300 खाटांचे होणार.

514

नांदेड-

नांदेडचे श्री गुरू गोविंदसिंघजी रुग्णालयाची श्रेणी वाढ होणार असून या ठिकाणी 100 खाटांऐवजी आता 300 खाटांचे रुग्णालय नागरीकांच्या सेवेसाठी तयार केले जाणार असल्याची घोषणा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. आज 75 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह आ.बालाजी कल्याणकर, आ.मोहनराव हंबर्डे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.अमरनाथ राजूरकर यांच्यासह जिल्ह्याच्या सर्व विभागांचे प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, देशात लोकशाही आणि संविधानाला मारक ठरणारी प्रवृत्ती तयार झाली आहे. पण त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने विकास थांबत नसतो. त्यामुळे इतिहास आणि सत्य बदलणार नाही. महात्मा गांधीचा अंहिसेचा मुलमंत्र भारतानेच नव्हे तर जगाने स्विकारलेला आहे. आजचे स्वातंत्र्य दिनाचे 75 वे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षात देशा प्रति प्रेम तयार करणारे अनेक कार्यक्रम होणार आहेत. नांदेड जिल्ह्यात सुध्दा असे कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.

सध्या विविध विषाणूंचा आपल्याल्या सामना करावा लागत आहे.त्यासाठी मास्क, सॅनीटायझर आणि शारिरीक अंतर या त्रिसुत्रीचे नागरीकांनी पालन करावे असे आवाहन मी यावेळी करतो,असेही चव्हाण म्हणाले. तिसरी लाट येण्याची भीती अजून कायम आहे. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजनाच त्यावर खरा उपचार आहे. नांदेड जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. मला घोषणा करताना आनंद आहे की, नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी रुग्णालयाच्या श्रेणीत वाढ करून त्या ठिकाणी 100 खाटांऐवजी 300 खाटा उपलब्ध होणार आहेत. सोबतच नवीन वैद्यकीय सुविधांची सोय नांदेडला व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे.

तसेच कर्करोग उपचारासाठी सुध्दा नांदेडला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. साथीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी नांदेडमध्ये साथ रोग प्रतिबंधक उपाय योजना करणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 कोटी रुपये खर्च येणार आहे. हृदयरोगावर उपचार करण्यासाठी नांदेड येथे कार्डीयाक हॉस्पीटल उभारणार आहोत त्यासाठी 12 कोटी रुपये खर्च येणार आहे. भोकरच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी सुध्दा वाढविण्यात येणार असून त्या ठिकाणी आता उपजिल्हा रुग्णालय होईल आणि तेथे 100 खाटांची सोय करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी जे-जे उपाय करण्याची गरज आहे ते सर्व करण्यासाठी मी संकल्प घेत आहे.

सध्या आपण महामारीशी लढत आहोत पण त्यातून विकासाची कामे थांबणार नाहीत यावर लक्ष देण्याची गरज आहे.राज्य सरकारने आपली ही जबाबदारी योग्य रितीने सांभाळली याचा मला आनंद आहे.आर्थिक स्त्रोत कमी झाले असतांना सुध्दा मला नांदेड जिल्ह्यासाठी बरेच काही करता आले याचा आनंद असून यामद्धे प्रशासकीय सुविधा असतील, शेतीची कामे असतील त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा आलेख उंचावणारा आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात नुकसान झाले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

या कार्यक्रमात कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या महसूल व पोलीस खात्यातील अनेकांचा सन्मान करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्राप्त करणारे पोलीस अंमलदार दिगंबर पाटील,अंबादास जोशी, चंद्रकांत पुलकुंठवार,धोंडीबा भुते, पांडूरंग माने, बालाजी कोंडावार, संतोष वच्छेवार, शेख इकबाल, सचिन खेडकर आणि कैलास राठोड यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.