हदगावात अवैध उत्खननात आढळलेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले, पतीनेच पत्नीला पुरले; दुर्धर आजाराने झाला होता मृत्यू

1,711

पुरुषोत्तम बजाज,

हदगाव, नांदेड –

नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे काल सोमवारी अवैध उत्खनन सुरू असताना सापडलेल्या महिलेच्या प्रेताचे गूढ उकलले असून हृदय हेलावणारी कहाणी समोर आली आहे. दुर्धर आजार व अत्यंत टोकाची गरिबी यातच जवळपास कोणीही नातेवाईक नाहीत. यामुळे उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह एकट्या पतीनेच ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये खदानीमध्ये दफन केल्याची बाब उघडकीस आली आहे. काल सोमवारी अवैध उत्खनन करत असताना जेसीबीने तो मृतदेह उघडा पडला.

नांदेडच्या वारंगा येथील मूळचे रहिवासी असलेले विठ्ठल पतंगे हे सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी हदगावात येऊन राहिले. सोबत पत्नी व मुले होतीच. व्यसनामुळे त्याचे संपूर्ण आयुष्यात उद्ध्वस्त झाले. मुलगा सध्या पुणे येथे कंपनीत रोजमजुरी करतो. तर दोन मुली विवाहित आहेत. दरम्यान विठ्ठल पतंगे यांची पत्नी पार्वतीला कॅन्सरचा आजार जडला. या आजाराचे अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. परंतु मागील काही दिवसात आजार खूपच बळावला. मागील काही दिवसापासून ते एका छोट्याशा खोलीत किरायाने राहत होते. परंतु उपचाराचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च आणि त्यातच काम धंदा नसल्यामुळे आणि वृद्धापकाळामुळे दोघांचीही उपासमार होत होती. विठ्ठल पतंगे हे मागील काही दिवसापासून रस्त्याच्या कडेला असलेल्या मटन हॉटेलमध्ये काम करत होते व आपली पोटाची खळगी भरत होते. परंतु पत्नीच्या बिमारीमुळे तिथेही काम करता आले नाही.

कॅन्सर वाढतच गेल्यावर नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय येथे कॅन्सरवर उपचार सुरू होता. त्यामुळे काही दिवस तेथे दोघांनाही खाण्यापिण्याची व्यवस्था झाली. आजार आटोक्यात येण्यासारखा नसल्यामुळे तेथूनही त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. नाईलाजाने हे जोडपे हदगावात आले. राहायला घर नसल्याने शेवटी नांदेडच्या रुग्णालयातून घरी पाठवल्यावर हदगावच्या बसस्थानकामध्ये दहा ते बारा दिवस काढले. सध्या एक दोन बसेस सुरू झाल्यामुळे व त्या कॅन्सरग्रस्त महिलेच्या अंगातून पू निघत असल्याने दुर्गंधी सुटल्यामुळे आगार व्यवस्थापनाने त्यांना येथून जाण्यास भाग पडले.

या दरम्यान त्यांनी अनेक वर्षांपूर्वी हदगावच्या दत्तबर्डी संस्थांनच्या टेकडी लगत असलेल्या सरकारी गायरान जमिनीवर ताबा केलेला होता. आणि आजही ती जमीन त्यांच्या ताब्यात आहे. कुठेही आधार नसल्यामुळे त्यांनी त्या टेकडीच्या बाजूला असलेल्या शेतीत कडाक्याच्या थंडीत मुक्काम ठोकला. खरे तर अशी कठीण अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. त्यांच्या परिस्थिती विषयी कुठेही माहिती नसल्यामुळे कोणीही या लोकांना मदत केली नाही. या त्यांच्या शेताच्या बाजूला दुसऱ्या एका गायरान जमिनीतून नेहमीच मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू होते. तिथे सुमारे पंचवीस ते तीस फूट खोलीची खदान तयार झालेली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच अवैध उत्खनन करण्यासाठी काल सायंकाळी एक जेसीबी चालक काही टिप्पर घेऊन मुरुमाचे ऊत्खनन करण्यासाठी तिथे गेले. उत्खनन करण्यास सुरुवात करतात एका महिलेची साडी आणि पाय उघडे पडून बाहेर आले. या प्रकरणाने घाबरून जाऊन हा खुनाचा वगैरे प्रकार असावा, म्हणून जेसीबी चालक व ऑपरेटर या दोघांनी जेसीबी सोडून जागेवरून पळ काढला.

हा धक्कादायक प्रकार पोलीस स्टेशनला समजल्यानंतर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पोलिस जमादार विश्वनाथ हंबर्डे व पोलीस उपनिरीक्षक दीपक फलाने यांना पाठवून घटना स्थळाची पाहणी केली. प्रेताची ओळख पटवण्यासाठी माहिती घेतली असता, बाजूच्या शेतात हे जोडपे राहत असल्याचे समजले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता विठ्ठल पतंगे यांनी सांगितले की, हा मृतदेह माझ्या पत्नीचा असून ती कॅन्सरमुळे मृत्यू पावली. आपल्याकडे अंत्यविधीसाठी पैसे नाहीत आणि कोणीही नातेवाईक जवळ नसल्यामुळे स्वतः एकट्यानेच पत्नीला दफन केल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ही बाब सत्य असल्याचे पोलिसांना आढळून आले. हदगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, बीट जमादार विश्वनाथ हंबर्डे व त्यांच्या सहकार्याने तात्काळ याबाबतचा तपास करत अखेर त्या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध लावला.

Leave A Reply

Your email address will not be published.