हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील 132 गावांना मिळणार फिल्टर पाणी-आ.जवळगावकर यांच्या पाठपुराव्याला यश

558 कोटी रुपयांची 132 गावासाठी योजना झाली मंजूर

1,392

हदगाव, नांदेड –

हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील 132 गावांना फिल्टरयुक्त पाणी मिळावे या साठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पाणी पुरवठा मंत्री ना.श्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर योजना मंजूर होण्यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता.

दिनांक 22 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने शासन निर्णय क्रमांक ग्रा. पा. पू. 2022/प्र क्र 112/पा. पु 18 अन्वये सदर 132 गावातील ग्रीड पाणी पुरवठा योजनेस 558 कोटी रूपये मंजुरीचा आदेश काढला. त्यामुळे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील 132 गावांना फिल्टरचे पाणी मिळणार आहे तसेच महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील मंजूर असलेल्या पेयजल मधील सगळ्यात मोठी योजना आहे हे विशेष.

असे असेल योजनेचे स्वरूप-

सदर योजनेचे पंप हाऊस इसापूर येथे होणार असून सदर ठिकाणावरुन पाणी भाटेगाव उमरी येथे फिल्टर हाऊस पाणी लिफ्ट करून फिल्टर झालेले पाणी पिंगळी, कोळी, पळसा, मनाठा, कामारवाडी, सोनारी, हिमायतनगर, या ठिकाणी मोठ्या टाक्या उभारून सदर टाक्यातुन 132 गावांना गावात टाक्या उभारून त्यातून गावात अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाइन करून घरोघर पाणी या योजनेद्वारे पोहचणार आहे .सदर योजनेसाठी 1200 किलोमीटर पाईप लाइन लागणार आहे. योजनेसाठी इसापूरला मिळणारे पाणी आरक्षण सुध्दा शासनाकडून प्राप्त झाले आहे.

पाणी पुरवठा मंजूर झाल्याच्या अनुषंगाने आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले की, मा.ना.अशोक चव्हाण साहेब यांचा संकल्नेतुन व पाणी पुरवठा मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्या सहकाऱ्याने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी योजना मंजूर झाली. माझ्या हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची कायम स्वरूपी सोय व्हावी या दृष्टीने इसापूर धरणातून पाणी लिफ्ट करून तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी 132 गावासाठी ग्रीड पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सतत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत बैठका घेऊन चर्चा केली, त्या अनुषंगाने पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य लाभले त्यामुळे माझ्या मतदार संघात 558 कोटी रुपयाची 132 गावांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्याबद्दल आ. जवळगावकर यांनी त्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.