दत्तमांजरी येथे २३ शिवभक्तांनी रक्तदान करून केली शिवजयंती साजरी !
माहूर, नांदेड –
कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी जिल्ह्यात जाहीर केलेल्या परिपत्रकाचे अनुपालन करीत अत्यंत साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करून रक्तदान शिबिराचे आयोजन करून दत्त मांजरीच्या शिवजन्मोत्सव समितीने शिवजयंती उत्साहात साजरी केल्याने परिसरातील सुज्ञ नागरीकातून समितीचे कौतुक होत आहे.
शिवध्वज व शिवप्रतिमेचे पूजन सरपंच सौ.विमलबाई पवार व प्रतिष्ठीत नागरिक दत्ता राऊत, काशीराम मोठे, नारायण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून नीट परीक्षेत एमबीबिएस प्रवेशास पात्र ठरलेले ऋषिकेश भारत पुरी याचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. वडील मुकबधीर दिव्यांग असलेल्या अभिषेक केंद्रे या विद्यार्थ्याने छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रातील अनेक कठीण प्रसंगाचे हुबेहूब चित्र नजरेसमोर आणून देत उपस्थित शिवभक्त व नागरिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे मान्यवराच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये २३ शिवभक्तांनी रक्तदान केले त्यामध्ये सौ.नम्रता कीर्तने या एकमेव महिला शिवभक्त यांचा समावेश होता. नांदेड येथील गुरु गोविंदसिंग रक्तपेढीच्या चमूचे जनसंपर्क अधिकारी राहुल वाघमारे, तंत्रज्ञ अनिल शिरडे, रवी होणराव, गजानन मोरे, हुसेन शेख, आकाश चिंदलिया यांनी रक्त संकलन केले. रक्तपेढी चमूचे नियोजन प्रदेश काँग्रेसच्या वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ.निरंजन केशवे यांनी केले.
रक्तदान शिबीर व नगरभोजन कार्यक्रमाने जयंती साजरी करण्यात आली. कोणताही गाजावाजा व अतिशयोक्तीपणा न करता अत्यंत साधेपणाने मात्र मोठ्या उत्साहात आगळा वेगळा उत्सव साजरा करून दत्तमांजरीच्या शिवजन्मोत्सव समिती व स्वराज्य मित्रमंडळाने समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी अध्यक्ष राम मोठे, विनोद राऊत, रितेश केंद्रे, सिद्धार्थ मोरे, सचिन भारती, जगदीश जाधव, नितेश भारती, उदय संगेवार, गजानन मोरे, दिनेश वाघमारे, गणेश आडे, गोकुळ राऊत, संतोष राऊत, माधव पेंदोर, विक्रम चव्हाण, कुंदन ठाकूर, निलेश आडे आदिसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोर सेना जिल्हा सचिव अर्जुन पवार यांनी केले.