बदनामी झाल्याच्या वैफल्यातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या; दोघांविरुद्ध लोहा पोलिसात गुन्हा दाखल
लोहा, नांदेड |
अलीकडील काही काळात आधुनिक मोबाईलच्या वापरामुळे भावी पिढी बिघडत चालल्याचे दिसून येत आहे. पालकांनी पाल्यांकडे मोबाईल किती प्रमाणात वापरण्यास द्यावा याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत काढलेले छायाचित्र त्याच्या मित्राच्या मदतीने समाज माध्यमावर (सोशल मीडिया) प्रसारित केल्याची माहिती सदर सतरा वर्षीय अल्पवयीन पिडीतेस समजल्याने आपली बदनामी झाली असे वाटल्याने तिने नैराश्यात व वैफल्यातुन गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना लोहा शहरात घडली. याप्रकरणी मयत मुलीच्या पित्याने लोहा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तालुक्यातील धावरी येथील एका कुटुंबातील दोन मुली शिक्षण घेण्यासाठी लोहा शहरातील पोलिस ठाणे परिसरातील प्रियदर्शनी नगरात शिंगाडे यांच्या घरी भाडयाने खोली करून मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत. मोठी मुलगी नीट परीक्षेची तयारी करते तर लहान सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी संत गाडगे महाराज महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेते. दि.6 रोजी मयत मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचार करून ती राहत असलेल्या खोलीवर दुपारी साडेतीन वाजता तिच्या पित्याने नेले. काही वेळानंतर मयत अल्पवयीन मुलीने आतून दरवाजा लावून घेतला. काही कालावधी उलटल्यानंतर ती बाहेर आली नसल्यामुळे तिचा पिता व मोठी मुलगी यांनी ती असलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावला परंतू प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजाच्या सामटितून आत पाहिले असता सतरा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत लटकत असल्याचे दिसून आले. तात्काळ विटांच्या सहाय्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करत तिला खाली उतरवून पुढील उपचारासाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी कर्तव्यावरील डॉ.गणेश चव्हाण यांनी पीडितेस तपासून मृत घोषित केले.
सदर अल्पवयीन मुलगी लोहा शहरातील संत गाडगे महाराज महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. त्यामुळे तिच्या पालकाने मुलीच्या शिक्षणासाठी लोहा शहरातील प्रियदर्शनी नगर येथे तिला मोठ्या बहिणीसह ठेवले होते. मोठी बहीण ही तिच्या सोबत राहून नीट परीक्षेची तयारी करत होती. पित्याने मोठ्या मुलीस अल्पवयीन मुलीच्या आत्महत्ये संदर्भाने विचारले असता तिने सांगितले की, यापुर्वी मयत मुलगी खोलीवर एकटी असल्याची संधी साधून गावातीलच विजय नामदेव गाडेकर हा तिला कसले तरी आमिष दाखवुन तिच्यासोबत मोबाईलमध्ये फोटो काढून तो नेहमी पिडीतेस सदर फोटो व्हायरल करतो म्हणुन धमकावत होता.
दि.2 रोजी विजय गाडेकर याचा मित्र युवराज श्रीराम काळे पाटील ( रूम पार्टनर) याने त्याच्या फेसबुक वरुन रात्री ‘लव्हली कप्पल’ म्हणुन मयत अल्पवयीन मुलीचा व विजय गाडेकर या तरुणाचा फोटो व्हायरल केला. अनेकांनी समाज माध्यमावर (सोशल मीडिया) आलेला फोटो पाहुन गावभर चर्चा केली असेल व आता आपली बदनामी झाली, असे वाटल्याने नैराश्यातून वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलीने आता माझे कसे होईल? असे म्हणत लोहा शहरातील प्रियदर्शनी नगरातील राहत्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने दि.6 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गळफास घेत जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी मयत मुलीच्या पित्याने लोहा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विजय नामदेव गाडेकर व युवराज श्रीराम काळे पाटील दोघे रा. धावरी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि गफार शेख करीत आहेत.