अर्धापूर तालुक्यातील लोणी बु.येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
अर्धापूर, नांदेड –
तालुक्यातील लोणी बु. शिवारातील रावसाहेब पांडुरंग भुस्से यांच्या शेतात बिबटयाने धुमाकूळ घालत परिसरातील शेतकऱ्यांची पुन्हा झोप उडवली आहे. सोमवारी दि.14 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास बिबटयाच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याने परिसरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.
लोणी बु. शिवारातील रावसाहेब पांडुरंग भुस्से यांच्या शेतात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. सदर घटना सकाळी शेतकऱ्यांच्या नजरेस आल्याने उघडकीस आली असून काही वर्षांपासून परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरावर हल्ला केला होता आतापर्यंत परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात एक बिबट्या विहिरीत पडल्याने त्याला काढण्यात वनविभागाला यश आले होते.व तो दुसऱ्या जंगलात सोडण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु काल घडलेल्या या घटनेने परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे.
लोणी शिवारात बिबट्या आखाड्यावर सालगड्याने पाहिल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा वीजपुरवठा व बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी सरपंच प्रतिनिधी विजय भुस्से यांनी केली आहे. विजय भुस्से बोलताना म्हणाले की परिसरातील शेतकरी जीव मुठीत धरून शेतीची कामे करीत आहेत. उसाचे व इतर पिकांचे क्षेत्र जास्त आहे.पाण्याच्या व शिकारीच्या शोधात बिबट्यांचा वावर आहे. एकीकडे बिबट्याचा त्रास तर दुसरीकडे रात्रीच्या लाईटचा वेळ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतीपंपांना दिवसा वीज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.