शहरातील खादी ग्रामोद्योग परिसरात गोठ्याला लागली आग; मोठा अनर्थ टळला

284

नांदेड –

शहरातील व्यंकटेश नगर, बाफना परिसरातील खादी ग्रामोद्योग येथील गायीच्या गोठ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. ही घटना बुधवारी दि. 21 रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली. तात्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

गोठ्यातील जनावरांना डास चावू नये व जनावरांचे डासांपासून बचाव व्हावे यासाठी लावलेल्या मॅटमुळे गोठ्याला आग लागली होती. बघता बघता ही आग गोठ्यात सगळीकडे पसरल्याने एकच धावपळ उडाली होती. गोठ्याच्या शेजारीच कपिल कदम यांचे घर असून घरातील लहान मुलांसह सर्वजण झोपले होते. दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड करून सगळ्यांना घरातून बाहेर काढले. तसेच घरातील सामानही बाहेर काढले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला लगेचच पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल तात्काळ दाखल होऊन लगेच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खादी ग्रामोद्योग परिसरात जवळपास दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांची घरे असून आग पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता.आग तात्काळ आटोक्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.