लोहा शहरातील वळण रस्त्यावर विद्युत पोल बसविणाऱ्या मजुराचा शॉक लागून मृत्यू

604

लोहा, नांदेड-

नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 चे काम प्रगतीपथावर आहे. त्यासह रस्त्यालगत विजेचे पोल बदलण्याचेही काम सुरू आहे. लोहा शहरातील वळण रस्त्यावर विद्युत पोल बदलण्याचे काम सुरू असताना विजेचा जबर शॉक लागून भंडारा जिल्ह्यातील एका 22 वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना दि.18 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली.

सद्यस्थितीत नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू असून महामार्गावरील पूर्वीचे रस्त्यालगतचे विद्युत पोल हटवून ते बाजूला घेवून उभे करण्याचे काम देखील सुरू आहे. तसेच लोहा शहरालगत वळण रस्त्याचे कामही सुरू आहे. वळण रस्त्यालगत असलेले जुने विद्युत पोल काढून बाजूलाच नवीन पोल उभे करण्याचे काम सुरू असून सदरील कामावर राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर आहेत.

भंडारा जिल्ह्यातील आमगाव बूथ ता.साकोली येथील तबरेज शेख माजीद अगवान (वय 22) हा मागील चार महिन्यांपासून सदर कामावर होता. दैनंदिन प्रमाणे तबरेज शेख हा सकाळी 9 वाजता लोहा शहरालगत दोन किमी अंतरावर असलेल्या बेरळी फाट्यानजिक वळण रस्त्याच्या वीज पोल बदली कामावर हजर झाला. दुपारी एक वाजता अचानक तेथील सर्व्हिस वायर मधून वीज प्रवाहित होवून तबरेजच्या उजव्या हाताला विजेचा जबर शॉक लागून तो बेशुद्ध झाला.

सदरील बाब कामावरील इतर कामगार व गुत्तेदाराच्या लक्षात आली त्यांनी तबरेज यास उपचारार्थ लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तबरेज यास दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास मृत घोषित केले. याप्रकरणी गुत्तेदार ओमकार शरद नरोटे यांनी दिलेल्या माहितीवरून लोहा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ ए.एम.केंद्र हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.