नांदेडच्या कृष्णूर येथील तरुणाची चित्रपट लेखन, दिग्दर्शन क्षेत्रात झेप..
पांडुरंग जाधव यांचा"गैरी" चित्रपट 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात होणार प्रदर्शित..
भगवान शेवाळे, नायगाव, नांदेड-
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कृष्णूर सारख्या ग्रामीण भागातील एका शिक्षकीपेक्षा असलेल्या तरुणाने मराठी चित्रपट लेखन व दिग्दर्शन क्षेत्रात झेप घेतली आहे. लहानपणापासून प्रचंड लिखाणाची आवड असलेल्या कृष्णूर येथील पांडुरंग बाबुराव जाधव यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकत गैरी या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शनची धुरा सांभाळली आहे.
या चित्रपटाचे निर्माते नायगांव तालुक्यातील कोलंबीचे भूमिपुत्र प्रसिद्ध व्यावसायिक प्रवीण बालाप्रसादजी बियाणी हे असून येत्या 16 डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. लेखक, दिग्दर्शक पांडुरंग बाबुराव जाधव हे मागील वीस वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत आहेत. कंधार तालुक्यातील गुंडा येथे सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यांच्या या जिद्दीमुळे संपूर्ण नायगाव तालुक्यात त्यांचं कौतुक होत आहे.
उत्तम स्टारकास्ट असलेल्या आणि एक सामाजिक समस्या मांडणाऱ्या “गैरी” या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर नुकताच लाँच करण्यात आला असून एका दुर्लक्षित समाजातील डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट “गैरी” या चित्रपटातून १६ डिसेंबरला रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या “गैरी” या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नायगाव तालुक्यातील कृष्णुर येथील रहिवासी पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केलं आहे.गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीतलेखन, अमितराज, मयुरेश केळकर यांचे संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.वैशाली सावंत, अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत.तर पार्श्वसंगीत मयुरेश केळकर यांचं आहे. विनोद पाटील यांचं छायालेखन आहे. अभिनेता मयुरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
एका दुर्लक्षित समाजातील डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाच्या माध्यमातून त्या समाजाच्या समस्या “गैरी” हा चित्रपट मांडतो. चित्रपटाच्या टीजरमधूनच चित्रपटाच्या रंजक कथेचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे “गैरी” चित्रपटाविषयी आता कुतुहल निर्माण झाले आहे.