जिल्हाधिकारी कार्यालयातील आगीच्या घटनेत जळालेल्या संचिकेतील कागदपत्रांच्या सर्व प्रति सुरक्षित -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड –
नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात असलेल्या गुंठेवारी विभागाला दि.15 गुरुवारच्या मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास अचानक आग लागली. यात गुंठेवारीच्या अनेक महत्त्वाच्या रेकॉर्ड असलेल्या संचिका जळून खाक झाल्या होत्या. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली.
या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट नाही.कारण गेल्या काही महिन्यापासून शहरात गुंठेवारीच्या संचिकांचा घोटाळा व या घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना, अशी दाट शंकाही व्यक्त करण्यात येत असताना बचत भवनातील आग घटनेत जळालेल्या संचिकेतील कागदपत्रांच्या सर्वप्रती टाऊन प्लॅनिंग विभागाकडे सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. शासन स्तरावर अनेक ठिकाणी कागदपत्रांच्या प्रति द्याव्या लागत असल्याने या प्रति इतर संबंधित विभागातून त्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
बचत भवनात आग लागल्यामुळे त्या कागदपत्राबाबत कोणतीही आशंका बाळगायचे कारण नाही.आग नेमकी कशी लागली? या बाबत चौकशी करण्यात येत असून कोणत्या घातपाताची शक्यता सध्या तरी दिसत नाही. चौकशीअंती यात जो कोणी दोषी आढळेल त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करू.”
– जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
अनेक मालमत्ताधारकांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव…
शासनाने दिलेल्या मुदतीत ग्रामीण भागातील हजारो मालमत्ताधारकांनी तारेवरची कसरत करून गुंठेवारीसाठी आपल्या फायली जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या या विभागात दाखल केल्या. परंतु, गेल्या काही दिवसांपासून गुंठेवारी बंद असल्याने अनेक फायली प्रलंबित होत्या. आगीची घटना घडल्याने गुंठेवारीसाठी फायली दाखल केलेल्या अनेक मालमत्ताधाकांनी या विभागाकडे धाव घेत, विचारपुस सुरू केली आहे.