लोह्यात पुन्हा एकदा चोरीची घटना.. घर फोडून कपाटातील सोने चांदीच्या दागिन्यांसह ४ लक्ष ९६ हजाराचा ऐवज लंपास; “कुठे आहे खाकी ” जनतेतून सवाल ?

806

प्रदीप कांबळे,

लोहा, नांदेड –

शहरातील गंगाखेड रोड परिसरातील बालाजी मंदिरा लगत यादव नगर भागातील एका घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड असा एकूण ४ लक्ष ९६ हजार ८०० रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि.१६ रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी लोहा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे शहरवासियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांतून स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे शहर तसेच पोलिस ठाणे हद्दी परिसरात चोरीच्या घटनेत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात ऐन दिवाळी सणात शिवकल्याण नगर भागातील कळसकर यांच्या घरात भर दिवसा चोरी झाल्यानंतर तपास लागतोय न लागतोय तोच गंगाखेड परिसरातील बालाजी मंदिर परिसरातील यादव नगरातील फिर्यादी अक्षय चिंचोरे यांच्या घरातील सर्व कुटुंबीय रात्रीचे जेवण आटोपून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी दि.१५ रोजीच्या रात्री १० ते दि.१६ रोजीच्या पहाटे तीन वाजेपर्यंतच्या कालावधीत स्वयंपाक गृहातील आतून लावलेल्या कडी कोंडे तोडून आता प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून आतील मोबाईल, कॅमेरा, सोन्या चांदीचे दागिने तसेच नगदी पन्नास हजाराची रोकड असा एकूण ४ लक्ष ९६ हजार ८०० रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

फिर्यादी, त्याची आई, भाऊ व बहीण हे सर्वजण रात्री घरातील हॉल मध्ये झोपले असता सदरील घटना घडली असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सदर घटने प्रकरणी अक्षय दशरथ चिंचोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोउपनि रेखा काळे करत आहेत. घटनास्थळी ठसे तज्ञ तसेच श्वान पथक यांनी पाहणी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मागील महिन्यात ऐन दिवाळी सणात शिवकल्याण नगरातील कळसकर कुटुंबीय खरेदीसाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी भरदिवसा घरात धाडसी चोरी करून नगदी रोकडसह लाखों रुपयाचे दागिने लंपास केले होते. मात्र सदर घटनेचा तपास लागतो ना लागतो तोच पुन्हा एकदा चोरीची घटना घडली. गत काही दिवसांपूर्वी पारडी नजीक राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन तब्बल आठ तास एका इसमाचे प्रेत रस्त्यावर पडून होते. पोलिसांची रात्रीची गस्त बंद झाली का..? असा प्रश्न उपस्थित होत असून “कुठे आहे खाकी” असा सवाल जनतेतून बोलला जात आहे. पेट्रोलिंगच्या नावे झोपा काढणाऱ्या आणि कागदोपत्री कर्तव्य बजावणाऱ्या लोहा पोलिसांच्या कामाची जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.