रेणुकादेवी संस्थान कर्मचारी सेवेत कायम न करण्याचा सहाय्यक जिल्हाधिकारी पूजार यांचा अट्टहास; झारीतील शुक्राचार्य बनण्याचे किर्तीकिरण पूजार यांचे गौडबंगाल आहे तरी काय !

७४ दिवसापासून सत्याग्रहास बसलेल्या कर्मचाऱ्यांपुढे यक्षप्रश्न, लवकरच काम बंद आंदोलनाचा इशारा !

573

जयकुमार अडकीने,

माहूर, नांदेड –

जगप्रसिद्ध असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे न्यासाच्या सन २०१४ मध्ये झालेल्या अद्ययावत घटनेत नमूद असतांना सुद्धा रेणुकादेवी संस्थान विश्वस्त समितीने संस्थानातील कर्मचाऱ्याना सेवेत कायम करण्याबाबत सातत्याने चालढकल केली आहे.

कर्मचाऱ्यानी देशातील सर्वात मोठी कामगार संघटना असलेल्या सिटूच्या सहकार्याने विविध आंदोलने केल्यानंतर संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी १६ फेब्रुवारी २०२० रोजी रेणुकादेवी संस्थानच्या विश्वस्त समिती बैठकीत ठराव घेऊन कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याबाबत संस्थानचे सचिव तथा किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकीरण पूजार यांनी वेतनश्रेणी ठरवून आठ दिवसात आदेश द्यावेत असा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला.

परंतु दोन वर्ष उलटले तरी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्याचे पत्र न मिळाल्याने व दरम्यानच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात दुर्दैवी घटना घडल्यानंतरही संस्थानाकडून जराही अनुकंप न दर्शविता सहानुभूती व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सुद्धा केली नसल्याने कर्मचाऱ्यात कमालीचा असंतोष पसरला व आपले भवितव्य अधांतरी वाटू लागल्याने दि.१० जानेवारी २०२२ पासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी संस्थानचे कर्मचारी सिटूचे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनात दैनंदिन कर्तव्य बजावत सत्याग्रह सुरु केला आहे.

सदरील कर्मचारी सत्याग्रहाला आजमितीस ७४ दिवस झाले असले तरी संस्थानचे सचिव तथा किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकीरण पूजार यांचा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न करण्याचा अट्टहास कायम असल्याचे दिसून येत असल्याने कर्मचारी हतबल झाले असून लोकशाही मार्गाचा अवलंब करूनही हक्क व न्याय मिळत नसल्याने कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. अत्यंत तुटपुंजा मानधनात गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याप्रति सहानुभूती नसल्याने कमालीचा असंतोष कर्मचाऱ्यात पसरलेला दिसून येत असून आता कर्मचारी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे.

याबाबत संस्थानचे सचिव तथा किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकीरण पूजार यांची भ्रमणध्वनी- व्दारे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन आपली प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर याबाबत सांगेन असे म्हणून प्रतिक्रिया देण्याचे टाळले. रेणुकादेवी संस्थान माहूर सिटू शाखाध्यक्ष अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव यांनी संस्थान तर्फे कर्मचाऱ्यांना कोणतेही विमा संरक्षण नसल्याने कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी असून वेतनश्रेणी ठरवून सेवेत कायम केल्यास कर्मचाऱ्यांच्या नौकरीला स्थैर्य मिळणार असल्याने लोकशाही मार्गाने गेल्या ७३ दिवसापासून सत्याग्रह सुरु आहे. ३० मार्च पर्यत ठोस निर्णय न दिल्यास काम बंद आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

एकंदरीत पूजार यांची वेळकाढू भूमिका पाहता संस्थान कर्मचारी सेवेत कायम न करण्यामागे सचिव तथा किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकीरण पूजार यांचे काय गौडबंगाल आहे? याबाबत संस्थान कर्मचारीसह रेणुकामातेच्या लाखो भक्तांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला असून संस्थानात काही अशासकीय विश्वस्तांचे हस्तक असलेले व्यवसायिक पुजारी यांना न्यासाच्या हिता विरुद्ध काम करण्यास कर्मचारी अटकाव करीत असल्याने व्यवसायिक पुजारी यांचे व कर्मचाऱ्यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य यास कारणीभूत आहेत की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.