हदगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना वा-यावर, पशुधन अधिकारी फक्त नावाला; डॉक्टर नाही कामाला

630
हदगाव, नांदेड –

हदगाव येथील श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना अनेक वर्षापासून नियमित वैद्यकीय अधिका-यांच्या प्रतीक्षेत आहे. हदगाव तालुक्याच्या परिसरातील शेतक-यांच्या गुरांना यामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने हा दवाखानाच आजारी झाला आहे.

अशीच एक घटना आज हदगाव तालुक्यातील फळी या गावातील संदीप कदम या शेतकऱ्याच्या शेळीला उपचार मिळाले नसल्यामुळे दहा ते पंधरा हजार रुपये किमतीची शेळी दगावली असल्याची तक्रार मनसेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांनी आज गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून पशुधन बाळगणा-यांच्या चिंतेत भर पडली आहे. कायमस्वरूपी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी मिळविण्यासाठी अजून किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे.पण याच शासनाच्या विविध प्रयत्नाला “खोडा” घालण्याचे कार्य खुद्द हदगाव तालुक्यात होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांचे पशुधन वाढविण्यासाठी शासन विविध प्रोत्साहन पर योजना राबवित आहे,पण गेल्या अनेक वर्षापासून हदगाव तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे पशुसंवर्धन विभागाची एक ही योजना या परिसरात विभागाच्या वतीने राबविली नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.कधीही महुद आणि परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले तर ही दवाखाने “कुलूप बंद” अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे, तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कधी त्यांचा फोन लागत नाही किंवा लागला तर शेतकऱ्यांना “उपदेशाचे डोस” ऐकावे लागत आहेत.

वरील सर्व कारणांमुळे या विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. मात्र भले मोठे राजकीय वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे, आपले कोणीच काही करू शकत नाही, असा आव आणणाऱ्या तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यात जावून आपल्या विभागाच्या तक्रारी पहाव्यात असे मनसे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांनी सांगितले आहे. हदगाव पशुवैद्यकीय पद रिक्त असल्यास, ती त्वरित भरावेत, फळी येथील शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी आणी कामचुकार पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी मनसेने दिलेल्या निवेदनात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.