नांदेडमद्धे मोठा कट उधळला? हरियाणामद्धे स्फोटकांसह चार दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्र कनेक्शन आले समोर; दहशतवादी होते रिंदाच्या संपर्कात

7,581

NEWS HOUR मराठी टीम

हरियाणाच्या करनाल जिल्ह्यात पोलिसांनी गुरुवारी सकाळी 4 अतिरेक्यांना अटक केली आहे. गुरप्रीत, अमनदीप, परविंदर व भूपिंदर अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण पंजाबचे असून, ते एका इनोव्हा कारमधून जाताना त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.  हे अतिरेकी तेलंगणा राज्यातील आदिलाबादेत शस्त्र पुरवठा करण्याच्या तयारीत होते व त्यांनी नांदेड भागातही यापूर्वी शस्त्रास्त्र पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दहशतवाद्यांचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे नांदेडमद्धे मोठं संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

4 दहशतवादी गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरुन जात असल्याची खबर गुप्तहेर विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी बांसताडा टोल प्लाझाजवळ सापळा रचून इनोव्हा गाडीला तपासणी करण्यासाठी रोखले तेंव्हा त्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात दारुगोळा लागला. पोलिसांच्या माहितीनुसार, या अतिरेक्यांकडून एक देशी पिस्तूल, 31 जिवंत काडतूसे व जवळपास प्रत्येकी अडीच किलो वजनाचे 3 लोखंडी पेट्या जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या बॉक्सची तपासणी केली असता त्यात स्फोटके असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांची मधूबन पोलिस ठाण्यात कसून चौकशी केली जात आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी सांगितले की, चारही आरोपी पाकिस्तानी अतिरेकी हरविंदर सिंग रिंदा याच्या इशाऱ्यानुसार काम करत होते. रिंदानेच त्यांना शस्त्र पुरवठा केला.त्यानंतर ते हे शस्त्र व दारुगोळा तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात पोहोचवणार होते. या बदल्यात त्यांना मोठी रक्कम देण्यात येणार होती. गंभीर बाब म्हणजे या अतिरेक्यांनी यापूर्वीही नांदेड परिसरात शस्त्रास्त्रे पोहचवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रिंदा त्यांना ड्रोनद्वारे शस्त्र पुरवठा करत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

रिंदा याने मोबाईलद्वारे अटकेतील तरुणांना लोकेशन पाठवले होते. त्यानुसार त्यांना फिरोजपूरला बोलावण्यात आले होते. फिरोजपूरच्या भागातील शेतात ड्रोनद्वारे स्फोटकांचा पुरवठा करण्यात आला होता. हे चौघे तेथून स्फोटके घेऊन तेलंगणात पोहोचवणार होते. पण, तत्पूर्वी, पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.

दहशतवादी होते रिंदाच्या संपर्कात

एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितले की, चार आरोपी पैकी गुरप्रीतने यापूर्वी तुरुंगाची हवा खाल्ली आहे.तुरुंगात त्याची राजवीर नामक व्यक्तीशी ओळख झाली. राजवीरने पाकिस्तानी अतिरेकी हरविंदर सिग रिंदाशी जूनी ओळख आहे. राजवीरनेच गुरप्रीतची रिंदाशी ओळख करुन दिली होती व 9 महिन्यांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. पोलिसांनी जप्त केलेली इनोव्हा कार पोलिस ठाण्या-समोरील मोकळ्या मैदानात उभी केली आहे. तिच्या आसपास दूरवर एकही वस्तू नाही. पोलिस पथक बारकाईने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.