मोठी बातमी ! नांदेडचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी; कुख्यात गुंड रिंदाच्या नावाने आले धमकीचे पत्र

8,699

नांदेड-

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या करणारे हल्लोखोर अद्यापही मोकाटच आहेत. पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे सापडलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. अशातच चक्क भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

सात महिन्यांपुर्वी कुख्यात गुंड रिंदाच्या नावाने १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आपल्याला धमकीचे पत्र आले होते, असा दावा करत चिखलीकर यांनी ते पत्रच प्रसार माध्यमांना दाखवले तसेच दहा दिवसांत पैसे दिले नाही, तर जीवे मारण्याची धमकी देखील या पत्रात देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. खा.चिखलीकरांच्या या पत्राच्या गौप्यस्फोटाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी आयजी, पोलिस अधीक्षक यांना पत्रही दिले होते, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही, असा खळबळजनक आरोप देखील चिखलीकर यांनी केला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि अवैध धंद्या संदर्भात चिखलीकर यांनी पोलिसांवर कडाडून टीका केली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना चिखलीकर म्हणाले, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर व्यापारी, उद्योजकांमध्ये कमालीची दहशत आहे. बियाणी यांची हत्या करणाऱ्यांचा शोध अद्याप पोलीस लावू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी आमची मागणी आहे.

सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजकच नाही, तर माझ्या सारखा लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित राहिलेला नाही. सात महिन्यापुर्वी रिंदा नावाच्या कुख्यात गुंडाकडून मला १० कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र आले होते. दहा दिवसांत खंडणी दिली नाही, तर तुम्हाला जीवे मारू, अशा इशारा या पत्रात देण्यात आला होता. या संदर्भात मी नांदेडचे पोलीस उप महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना पत्र देखील पाठवले होते.पण आमच्यावर राजकीय दबाव असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात कुठलीच चौकशी केली नाही. त्यामुळे मी देखील या विषयाची वाच्यता करायची नाही, असे ठरवून टाकले होते.सध्या बियाणी यांच्या हत्येमुळे आधीच जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे, त्यात जर माझ्या सारख्या लोकप्रतिनिधीलाही धमकी येते असे समजले तर लोक आणखी घाबरतील म्हणून मी शांत होतो. तक्रार करून देखील माझ्या सारख्या लोकप्रतिनिधीला सुरक्षा नाही व धमकी पत्राची चौकशी देखील झाली नाही, असा गंभीर आरोप देखील खा.चिखलीकर यांनी नांदेड पोलीस प्रशासनावर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.