खासदारांच्या हिटलरशाही धोरणा विरोधात भाजपा हायकमांडकडे दाद मागणार - माजी उपनगराध्यक्ष शरद पवार
लोहा, नांदेड –
नांदेड जिल्ह्यात सध्या भाजप पक्षात एकाधिकारशाही सुरू असून खासदारांना घराणेशाही शिवाय काहीच दिसत नाही.वीस वर्ष प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. पक्षाचे एकनिष्ठतेने काम केले. परंतु त्यांनी माझ्यावर अन्याय केला.खासदारांना मी केवळ दोन महिन्यांचा अधिकचा उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ मागितला असता त्यांनी माझे न एकता माझ्यावर पालिकेत अविश्वास आणला. तसेच मला भाजप तालुकाध्यक्ष पदावरून हटविल्याचे प्रसिद्धीस दिले असल्याचे वर्तमानपत्रातील बातमी मधून दिसले. मात्र मी भाजप हायकमांडकडे यासंदर्भात दाद मागणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
लोहा शहरातील लातूर रोडवरील माने नगर येथील माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष पवार बोलत होते. पुढे बोलतांना माजी उपनगराध्यक्ष पवार म्हणाले, लोहा पालिकेत मंगळवारी माझ्या उपाध्यक्ष पदावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी बैठक घेण्यात आली व अविश्वास पारित देखील झाला. हे काही मतदारसंघाला नवीन नाही. या अगोदर संभाजीराव धुळगुंडे, मारोती पाटील बोरगावकर, ढेपेबाई व रंगनाथ भुजबळ यांच्यावर देखील अशाच प्रकारे अविश्वास पारीत करण्यात आला होता त्यामध्ये आता माझा समावेश झाला आहे. तालुक्यात सध्या (खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता) खासदारांची हिटलरशाही व एकाधिकारशाही सुरू आहे. त्यांच्याच घराणेशाहीची हुकुमशाही सुरू आहे.
लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू आहे. पुतळा कामाच्या सुरुवातीस मी वेळोवेळी खासदारांची तारीख मागितली मात्र त्यांनी चालढकल करत तब्बल चार महिने मला तारिख दिली नाही व वेळ मारून नेला. त्याचे कारण मला ठाऊक नाही. तसेच मला स्मारकाच्या ठिकाणी जायचे नाही, तिथे फोटो काढायची नाही अशी सक्ती केली. शिवरायांचे स्मारक होईपर्यंत केवळ मला दोन महिन्यांचा अवधी द्या.त्यानंतर मी राजीनामा सादर करतो अशी विनंती केली.मात्र माझे एक ना ऐकता माझ्याविरुद्ध पालिकेत अविश्वास आणून तो संमत केला. तसेच माझ्यावर गद्दारीचा ठपका ठेवत मला भाजप तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याचे वर्तमनपत्राद्वारे समजले.
मात्र गद्दार कोण आहे हे सर्वानाच माहित आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य शिवसेना पक्षातून निवडून येऊन भाजपाचे काम करतात. ती गद्दारी नाही का..? असा सवाल करत मी भाजपाचा सलेक्ट तालुकाध्यक्ष नाही तर इलेक्ट अध्यक्ष आहे. त्यामुळे खासदाराला किंवा जिल्हाध्यक्ष यांना मला भाजप तालुकाध्यक्ष पदावरून काढण्याचे अधिकार नाहीत. त्याचा अधिकार पक्षातील वरिष्ठांनी आहे. आणि सदरील पद हे तीन वर्षांसाठी असते. मी पक्ष हायकमांडकडे दाद मागणार असून लवकरच प्रदेशाध्यक्षांना भेटणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच मी भाजपाचा व भाजपा माझा पक्ष असल्याचा पुनरोच्चार केला.