लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात; दोन हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
नांदेड –
सध्या नांदेड तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी माणिक बोधगिरे यांनी सातबारावर तक्रारकर्त्याच्या आईचे टोपण नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांच्याकडून 2 हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. त्यांनी तक्रारकर्त्याकडून 3 हजार रुपयांची मागणी करून तडजोड अंती दोन हजार रुपये मागितले होते.
तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेताच्या सातबारावर आईचे टोपण नाव समाविष्ट करण्यात यावे, याबाबतचा रितसर प्रस्ताव वडगाव व वाजेगाव सज्जाचे तलाठी माणिक काशिराम बोधगिरे, वय 47 रा.रविराज नगर तरोडा नाका, नांदेड मुळ रा.जंगमवाडी ता.कंधार जि.नांदेड यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. फेरफार उताऱ्यावर तशी नोंद करण्यासाठी तलाठी बोधगिरे यांनी 3 हजार रूपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. तडजोडी अंती 2 हजार रूपये लाच देण्याचे ठरले.
मात्र, तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली.दि.19 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 23 डिसेंबर रोजी सापळा लावला. यात दोन हजार रूपयांची लाच घेताना तलाठी माणिक बोधगिरे अडकले.दरम्यान यापूर्वीही तलाठी बोधगिरे यांनी लाच घेताना पकडण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही त्यांनी लाचेचा मोह सोडला नाही व यातून कोणताही बोध घेतला नाही.
लाचलूचपत विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पर्यवेक्षण अधिकारी अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईत सापळा अधिकारी कालिदास ढवळे, गजानन बोडके, एकनाथ गंगातीर्थ, हणमंत बोरकर, अंकुश गाडेकर, अरशदखान, ईश्वर जाधव, मारोती सोनटक्के यांनी कामगिरी बजाविली.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड मोबाईल क्रमांक 9623999944
अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.नांदेड
मोबाईल क्रमांक – 9850483337, कार्यालय दुरध्वनी – 02262-253512
@ टोल फ्रि क्रं. 1064