फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसरा मोठा प्रकल्प आणू हे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला फुग्याचं आमिष दाखवण्यासारखं; शरद पवारांची टीका
पुणे –
फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाच्या आमिषाला अर्थ नाही. हे तर रडणाऱ्या लहान मुलाला पालकांनी फुग्याचं आमिष दाखवण्यासारखं आहे. लहान मुलाची समजूत काढावी अशा प्रकारची ती समजूत आहे. त्यात महाराष्ट्राची प्रतिष्ठा नाही, त्यामुळे त्यावर चर्चा करू नये, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या नव्या आश्वासनावर केली. पुणे येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. तळेगाव हीच प्रकल्पासाठी योग्य जागा होती. प्रकल्प गुजरातला गेल्यावर आता चर्चा कशाला.फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाचे आमिष दाखवणे याला अर्थ नाही. रडणाऱ्या लहान मुलाची समजूत काढावी, अशा प्रकारची ती समजूत आहे. त्यात महाराष्ट्राची प्रतिष्ठा नाही. झालेलं झाल, नवीन काय करता येईल का हे बघा. प्रकल्प पुन्हा आणण्यासाठी मोदींनी मदत केली तर त्यांचे स्वागत असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.
सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी उद्धव ठाकरेंचे सरकार जबाबदार आहे, असे म्हणतात. पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे व उदय सामंत हे दोघेही मंत्री होते. तेच दोघे आता आरोप करत आहेत, हे काय शहाणपणाचे लक्षण नाही. महाराष्ट्राचा प्रकल्प बाहेर जायला नको होता पण गेला आता चर्चा करायला नको, असे पवार यांनी म्हटले आहे.
राज्य प्रमुख अगदी गतीने सगळीकडे जातायत. गतीने फिरून राज्य समजून घेण्याचा प्रयत्न असेल. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या श्रीगणेश यात्रेवरून शरद पवारांनी लगावला. आता रोज काहीतरी उकरून काढले जात आहे. आरोप प्रत्यारोप बंद करून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र काम करावे. शिंदे सरकारचा कारभार अजून मला दिसला नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्राच्या नेतृत्वामुळे सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र हा नेहमीच प्रथम क्रमांकावर होता. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जाणे हे दुर्देव आहे. आता काय झाडी, काय डोंगर हेच बघायला मिळते. सगळी यंत्रणा थंड झाली आहे का? महाराष्ट्रावर आता राज्यकर्त्यांचं लक्ष आहे का? अशा शब्दांत पवार यांनी राज्यातील राज्यकर्त्यांचा समाचार घेतला आहे.