बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरण ; ‘त्या’ निनावी पत्राद्वारे पोलिसांची फिरकी घेणाऱ्याचा लावला छडा, शेतीच्या वादातून गोवण्यासाठी पत्र पाठविल्याचे निष्पन्न

2,409

नांदेड –

नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येबाबत पाठविण्यात आलेल्या पत्राचा पोलिसांनी 24 तासात छडा लावला आहे. शेतीच्या वादातून खोडसाळपणे एकाला गोवण्यासाठी हे पत्र पाठविण्यात आल्याचे ‘एसआयटी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यासह राज्यभरात गाजत असलेल्या संजय बियाणी यांच्या हत्येबाबत या निनावी पत्रात उल्लेख असल्याने एकच खळबळ उडाली होती.

शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची निवासस्थानासमोर गोळ्या झाडून अनोळखी हल्लेखोरांकडून आठवडाभरा पूर्वी हत्या करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास एसआयटी (विशेष तपास पथक) करत आहे. तपास सुरू असताना मात्र संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आले. ज्यामध्ये “बहुत बड़ा दादा पांडूरंग येवले आनंदनगर मे रहता हैं, अटाळा का रेती माफिया हैं. इसमे परभणी मे कोई बिल्डर नहीं रहेगा, इसलीए बियाणी को ठोकने का मनसुबा बनाया गया “अशा आशयाचे पत्र पाठविल्यावरून सदरील पत्र बियाणी यांचे कुटुंबीयांनी विशेष तपास पथक यांच्याकडे स्वाधीन केले.

दरम्यान, या निनावी पत्राच्या अनुषंगाने एसआयटीच्या टीमने कसून तपास केला असता, सदरील पत्र विठ्ठल संतराम सुर्यवंशी,वय 74 वर्ष, राहणार अटाळा, तालुका धर्माबाद, जि.नांदेड यांनी पांडुरंग येवले यांना सदर गुन्ह्यात अडकवण्यासाठी केलेला खोडसाळपणा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांकडून पांडुरंग येवले यांना अटक व्हावी व त्यांना त्रास व्हावा या उद्देशाने परभणी येथून सदरील पत्र पाठविल्याचे तपासात उघड झाले आहे. शेती विषयक वैयक्तिक वादातून हे पत्र लिहिल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्याने पोलिसांची फिरकी घेणाऱ्याला अटक करून पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक प्रदिप भानुदास गौंड, पोलीस स्टेशन विमानतळ यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन विमानतळ येथे सदर व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.