नांदेडमद्धे भर रस्त्यात ‘बर्निंग ट्रक’चा थरार ! आगीत एकाचा होरपळूूून मृत्यू; मृतदेहाचा झाला अक्षरशः कोळसा

1,968

नवीन नांदेड –

नांदेड-उस्माननगर रोडवरील शाहुनगर पाटीजवळ एका ट्रकला अचानक लागलेल्या आगीत एक जण जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना दि.26 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नांदेड उस्माननगर रोडवरील बिजली हनुमान मंदिर देवस्थान समोरील पॉवर स्टेशनजवळ असलेल्या रोडवर एका ट्रकला अचानक भीषण आग लागली. नांदेडकडून उस्माननरकडे जात असलेल्या रोडवर मध्यरात्री साडे अकरा वाजता तांदळाने भरलेला एम.एच.40 बी.जे 9604 या क्रमांकाच्या ट्रकच्या कॅबिनने अचानक पेट घेतला व बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. यात कॅबिनच्या आतमध्ये एक जण अडकल्याने त्याचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव नितिन सटवाजी कांबळे, राहणार हळदा असे आहे.

अचानक आगीचा भडका उडाल्याने ट्रकचे टायरही जळून खाक होऊन मोठा स्फोट झाला. या घटनेत ट्रक मधील ताडपत्री व तांदूळ जळाला आहे. सुदैवाने आग लवकर आटोक्यात आणल्याने घटनास्थळाच्या बाजुला काही अंतरावरच महावितरणचे मोठे उपकेंद्र असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ अग्नीशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बुक्तरे, अंमलदार जे.एस.जावेद, डी. एल. गव्हाणकर यांनी पंचनामा करून सकाळी सातच्या दरम्यान मृतदेह मयताचा भाऊ व नातेवाईक यांच्या समक्ष काढून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, घटनास्थळी सकाळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. यामुळे नांदेड उस्माननगर रस्त्यावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यामुळे अनेक तर्कवितर्काना उधाण आले आहे. आग कशामुळे लागली, ट्रकमधील तांदूळ नेमका कोणता होता, असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.