संस्कृतीची नाळ जपत दत्तमांजरी येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी !

पंकजपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाने दत्तमांजरीवासी मंत्रमुग्ध !

249
माहूर, नांदेड –

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंतीनिमित्त मौजे दत्तमांजरी येथे समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. दि.१३ रोजी सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजेरीवादक पंकजपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार जयकुमार अडकीने, राज ठाकूर, सरपंच सौ. विमलबाई पवार यांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराज जन्मोत्सव समिती तर्फे नीट परीक्षेत एम.बी.बी.एस. प्रवेशास पात्र ठरलेले विद्यार्थी ऋषिकेश भारत पुरी व बिएएमएस प्रवेशास पात्र ठरलेल्या कु.मोनिका सुजाण भारती या विद्यार्थ्यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.


तर विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या माता सौ.जयाबाई भारत पुरी व सौ. विद्या सुजाण भारती या दाम्पत्यांचा सरपंच सौ.विमलबाई पवार यांनी साडीचोळी शाल व पुष्पहार भेट देऊन संत सेवालाल महाराज जन्मोत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. पंकजपाल महाराज यांनी आपल्या कीर्तनात हाच धागा पकडून सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश देत समाजातील विविध अनिष्ट रूढी परंपरा व आधुनिक युगातील मोबाईलचा अयोग्य व अति वापर, मुलांना संस्कार देण्याऐवजी धन कमविण्याच्या मागे लागत मुलांच्या शिक्षणाकडे व भवितव्याकडे दुर्लक्ष करीत असलेल्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून व्यसनाधिनता, आर्थिक स्थिती बेताची असताना कर्ज काढून लग्नसमारंभ साजरा करण्याच्या स्पर्धा करणे या बाबीपासून लोकांनी परावृत्त होण्यासाठी आपल्या कीर्तनातून जोरदार फटकार लगावून संत सेवालाल महाराज यांचे चारित्र्य उलगडून दाखवत त्यांनी दाखविलेल्या मार्गाच्या विपरीत समाज कोणत्या वळणावर जात आहे हे सांगून उपस्थितांचे मनोरंजनातून प्रबोधन केले.

दि. १४ रोजी तुकाराम महाराज पांडूरणा यांचे बंजारा भजनातून क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. दि.१५ रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित संस्कृती प्रमाणे तांड्याचे नायक कारभारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भोग लावून सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची गावातून परंपरागत डफडेच्या गजरात युवक व युवती महिला व पुरुष मंडळींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक भिमनीपुत्र मोहन नाईक यांचे सुपुत्र माहूर येथील जेष्ठ विधिज्ञ सि.एम. राठोड यांनी वाचन संस्कृती व पुस्तकाचे महत्व पटवून देत संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर सखोल माहिती दिली व मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सेवालाल महाराज यांचे औद्योगिक धोरण या विषयावर महाराजांचे जीवनचरित्रातील व्यापारी सेवालाल महाराज हे आपल्या व्याख्यानातून उपस्थितांसमोर मांडले.

माजी आ.प्रदीप नाईक यांनी मौजे दत्तमांजरी येथे मुलींनी शिक्षणात पुढे यावे असे आवाहन केले. तर संत सेवालाल महाराज मंदिराच्या सभागृहासाठी १५ लाख रुपये निधी लवकरच देणार असल्याचे आश्वासन दिले. शिवसेना किनवट विधानसभा संघटक सचिन नाईक यांनी समाजाच्या कोणत्याही कामासाठी हाक द्या, मी साद देईन असे आश्वासन दिले. माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी युवकांनी महापुरुषांच्या चरित्रांचे वाचन करून महापुरुष डोक्यात घुसवून वाटचाल करून स्वयंप्रकाशित बनावे असा युवकांना सल्ला दिला. तर माहूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी माहूर येथील वसंतराव नाईक चौक मालकी व सुशोभीकरणाकरिता ५ मार्च रोजी न.प.च्या पहिल्या मिटिंगमध्येच ठराव मंजूर करण्यात येईल व चार महिन्याच्या आत चौक सुशोभीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी माजी जि.प. सदस्या सौ. आशाताई धरमसिंग राठोड, सुमित राठोड, कुंदन पवार, कॉ. किशोर पवार, सुदर्शन नाईक, मारोती रेकुलवार, पत्रकार दुर्गादास राठोड, पत्रकार कैलास बेहेरे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष साहेबराव वाघमारे, आदि मंचावर उपस्थित होते. समितीच्या ३४ सदस्यांनी इंदल सीताराम पवार यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थांकडून लोकवर्गणी न मागता समितीमध्येच निधी संकलन करून उत्सव साजरा करत सेवाभक्तांनी स्वखुशीने दिलेल्या वर्गणीत उत्सवाचा खर्च भागवित वेगळा आदर्श निर्माण केला हे विशेष उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोर सेना जिल्हा सचिव अर्जुन पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ. विमलबाई बळीराम पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी शिक्षक सुरेश पवार, केरसिंग पवार, रमेश चव्हाण, मुख्याध्यापक यशवंत वाघमारे, शिक्षक मधुसूदन कुलकर्णी आदिसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.