लोहा येथील पेनुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक पाच हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज

1,306
प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेड –
तालुक्यातील पेनुर आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाने सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या मुलाकडून रजा रोखिकरणाचा मंजूर धनादेश नावावर जमा करण्यासाठी पाच दिवसांपूर्वी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सदरील रक्कम लोहा शहरातील शिवाजी चौकातील एका हॉटेलमध्ये दि. 8 रोजी दुपारी स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदर कनिष्ठ सहाय्यकास रंगेहाथ पकडले.

लोहा तालुक्यातील पेनुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत सिद्धार्थ मारोती सोनकांबळे (वय 34 वर्ष) रा. कंधार याने सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या मुलाकडे त्यांच्या आईच्या नावाचे रजा रोखिकरण मंजूर झालेल्या बजेटचा धनादेश पंचायत समिती येथून काढून त्यांच्या आईच्या म्हणजेच सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी दि. 3 फेब्रुवारी रोजी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदारास मागणी केलेल्या लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानुसार आज दि. 8 रोजी मंगळवारी दुपारी एसीबी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, नांदेड परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. शेषेराव नितनवरे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ किशन चिंतोरे, पो. ना. हणमंत बोरकर, सचिन गायकवाड, ईश्वर जाधव व गजानन राऊत यांच्या पथकाने शहरातील शिवाजी चौकातील एका हॉटेल मध्ये सापळा रचून तक्रारदाराकडून आरोपी कनिष्ठ सहाय्यक सिद्धार्थ सोनकांबळे यास पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडुन ताब्यात घेतले. याप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास एसीबीचे पथक प्रमुख करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.