राजकीय घडामोडीत चिखलीकर पिता-पुत्र “सागर” बंगल्यावर; देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
मुंबई / नांदेड :
राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आणि या बदलाचे केंद्र मुंबई स्थित सागर बंगला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीत जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर या पिता – पुत्रांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही.सत्ता आली तर प्रवीण पाटील चिखलीकर यांना मोठी जबाबदारी मिळू शकते. अशी चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांच्या गोटात सुरू आहे.
राज्यात सत्तांतर होणार असे मानले जात आहे. पंढरपूर येथे विठुरायाच्या चरणी माथा टेकविल्यानंतर जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी दोन दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल आणि आषाढीची पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील, असा विश्वास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. त्यानंतर दोन दिवसात राज्यात सत्तांतर होण्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली. उद्या गुरुवारी बहुमत सिद्ध करावे, असे राज्यपालांनी निर्देश दिले त्याच सर्व राजकिय घडामोडीत जेथे राज्याच्या राजकारणाचे केंद्र बिंदू सागर बंगला बनला आहे.
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.तुषार राठोड युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी भेट घेतली. प्रवीण पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. जिल्हा परिषदेच्या गट रचनेत चिखली गाव कौठा गटात समाविष्ट करण्यात विरोधकांना यश आले. या संदर्भात ओझरता उल्लेख झाल्याचे कळते. विधानसभा निवडणूक काळात उमेदवारी मिळाली नाही. तेव्हा प्रवीण पाटील चिखलीकर यांची नाराजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली होती आणि शब्द दिला होता. आता अडीच वर्षानंतर पुन्हा राज्यात भाजपाची सत्ता येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटीचा वेळ तर दिलाच शिवाय भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्याशी संवाद साधला.या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आता प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांना आपले सरकार आले तर प्रवीण पाटील यांना मोठे पद मिळू शकते अशी आशा वाटते आहे.