लोहा शहरवासियांनी मालमत्ता कर वेळेवर भरावा – मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांचे आवाहन

133

प्रदीप कांबळे,

लोहा, नांदेड –

लोहा शहरातील मालमत्ता धारक नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरावा जेणेकरून शहराच्या विकासासाठी मदत मिळेल असे आवाहन लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी केले आहे. आर्थिक वर्ष संपत आले असून त्या धर्तीवर लोहा पालिका सभागृहात मालमत्ता कर विभाग व पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक पालिकेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्याप्रसंगी पेंटे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

पालिकेच्या वतीने मालमत्ता कर व नळ बिल वसुली मोहीम सुरू आहे. शहरवासियांनी थकीत व सध्याची मालमत्ता कर (घरपट्टी), नळ बिल (नळ पट्टी) वसुली मोहिमेवर असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांकडे वेळेवर भरावी. ज्यांच्याकडे थकीत नळ बिल किंवा मालमत्ता कर असेल आणि ते कर भरणा वेळेवर करत नसतील तर अशा थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात येईल आणि ज्यांची नळ बिल वसुली झाली नसेल अशांची नळजोडणी तोडण्यात येईल, अशी सक्त सूचना पालिकेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी दिल्या असून कर धारकांनी कर भरणा वेळेवर करून संभाव्य जप्ती टाळावी. तसेच कर स्वरूपातील निधी अंतर्गत शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी नागरिकांनी पालिकेकडे कर भरणा वेळेवर करावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी पेंटे यांनी केले आहे.

यावेळी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, मालमत्ता कर व नळ वसुली विभाग प्रमुख माधव पवार तसेच पालिकेतील भाजपचे गटनेते करीमभाई शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक प्रतिनिधी नबीसाब शेख सह कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.