जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची पेनूर येथील अनधिकृत वाळू घाटावर अचानक रात्रीची एन्ट्री ! 6 तराफे केले नष्ट; वाळू माफियांचे धाबे दणाणले

1,235

प्रदीप कांबळे,               

लोहा, नांदेड –

लोहा तालुक्यातील पेनूर, बेटसांगवी, कौडगाव आदी शिवारातून जाणाऱ्या गोदापात्रातून वाळू माफिया दिवस रात्र बेसुमार अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करत आहेत.सदरील प्रकारावर महसूल प्रशासनाकडून सातत्याने कार्यवाही होऊन देखील वाळू माफिया पुन्हा नव्या दमाने व नव्या जोमाने वाळू उपसा प्रचंड प्रमाणात करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.सदर प्रकरण संदर्भाने नांदेडचे नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.१४ रोजी पेनूर शिवारातील गोदापात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा ठिकाणी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक एन्ट्री केली.साक्षात जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी एन्ट्री मारताच वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

प्रशासनाकडून अधिकृतरित्या लोहा तालुक्यातील वाळू घाटांचे लिलाव सुटलेले नसताना पेनूर सह अनेक गावांच्या शिवारातील गोदा नदी पात्रातील घाटावरून दिवसरात्र बेसुमार वाळू माफियाकडून वाळूचा उपसा होत आहे. सदर प्रकारावर अंकूश घालण्यासाठी लोहा महसूल प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असले तरी वेळ चुकवून पुन्हा नव्या जोमाने वाळू माफिया पात्रातून अनधिकृत वाळूचा उपसा व वाहतूक करत आहेत.सदर प्रकरणी नांदेडचे नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोहा तालुक्यातील पेनूर शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपसा ठिकाणी अचानक एन्ट्री मारली. त्याप्रसंगी सहा तराफे मिळून आले.

सर्व तराफे कंधारचे उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक, लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश बा.मुंडे, सोनखेडचे सपोनि विशाल भोसले, मंडळ अधिकारी डी.एल.कटारे, तलाठी राजू इंगळे, नेताजी रायाजी, मोतीराम पवार, मारोती कदम आदींच्या पथकाने तराफे नष्ट केले. सदरील कार्यवाही रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. कार्यवाही पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी राऊत हे पेनूर येथे ठाण मांडून होते.

यापूर्वी पेनूर व बेटसांगवी येथे अनेक तराफे नष्ट करत आढळून आलेला अवैध रेती साठा जप्त करुन सुमारे ५ लक्ष रुपयाचा महसुल लिलावमधून जमा केला असल्याची माहिती नायब तहसीलदार अशोक मोकले यांनी दिली. सदरील कार्यवाहीने जिल्ह्यातील वाळू माफियांच्या धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.