मातोश्री भीमाई व्याख्यानमालेचा दशकपूर्ती सोहळा, आज दि.२५ रोजी प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांचे व्याख्यान

90

दादाराव आगलावे, 

मुखेड, नांदेड –

मातोश्री भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने दि.२५ फेब्रुवारी रोज शुक्रवारी सायंकाळी ६.०० वाजता कोत्तावार ऑईल मील बाऱ्हाळी रोड येथे, ‘जीवन ज्यांना कळले हो’ या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे,सातारा हे व्याख्यान देऊन मातोश्री भीमाई व्याख्यानमालेचे दशकपूर्ती पुष्प गुंफणार आहेत.

व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरीचे अध्यक्ष श्री.शिवाजी नागोराव जाधव राहणार असून यावेळी श्रीमती विजयाताई मार्तंडराव देशपांडे बा-हाळी यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार देऊन संयोजन समितीच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. मुखेड येथील सुप्रसिध्द सर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे यांनी गेल्या १० वर्षापासून आपल्या आईच्या नावाने मातोश्री भीमाई व्याख्यानमालेची सुरुवात केली.

व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मुंबई येथील प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांनी आई या विषयावर गुंफले, दुसरे पुष्प सातारा येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे यांनी सुंदर जगण्यासाठी या विषयावर गुंफले, तिसरे पुष्प सातारा येथील डॉ.राजेंद्र पवार यांनी सुजाण पालकत्व या विषयावर गुंफले, चौथे पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रा.तेज निवळीकर यांनी एकविसाव्या शतका समोरील आव्हाने या विषयावर गुंफले. पाचवे पुष्प पुणे येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा सुप्रसिद्ध वक्ते डॉ.रामचंद्र देखणे यांनी ज्ञानदेवे रचिला पाया .. तुका झालासे कळस .. या विषयावर गुंफले. सहावे पुष्प ज्येष्ठ समाजसेवक तथा जीवनशैली व आरोग्य विषयाचे अभ्यासक अमरावती येथील डॉ.अविनाश सावजी यांनी शतायुषी व्हा, पासवर्ड आरोग्याचा या विषयावर गुंफले. सातवे पुष्प ताण तणाव तथा नातेसंबंध समूपदेशक डॉ.सचिन देशमुख औरंगाबाद हे स्वभावालाही औषध असते या विषयावर गुंफले. आठवे पुष्प औरंगाबाद येथील जगन्नाथ दिक्षीत यांनी विनासायास वेट लॉस या विषयावर गुंफले. नववे पुष्प नांदेड येथील डॉ.श्रीराम राठोड व महाराष्ट्र राज्याचे अपंग विभागाचे माजी आयुक्त आर.के. गायकवाड यांनी विपश्चना परीचय व अनुभूती या विषयावर गुंफले.

प्रत्येक पुष्पात समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो. आज दिनांक २५ फेब्रुवारी रोज शुक्रवारी महाराष्ट्राचे प्रसिद्ध विचारवंत यशवंत पाटणे हे ‘जीवन त्यांना कळले हो’ या विषयावर दशकपुर्ती पुष्प गुंफणार आहेत. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक मुखेडभूषण डॉ.दिलीप पुंडे, सौ.माला पुंडे, डॉ.गौरव पुंडे, डॉ. तेजस्वीनी पुंडे, संजय पुंडे यांच्यासह मातोश्री भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.