ना.अशोक चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी शेवाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

शहरातील कुसुम सभागृहात पार पडला सोहळा..

219
नायगाव, नांदेड –

बरबडा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत कार्यरत तसेच विविध कलागुण अंगी असलेले शिक्षक शिवाजी महादजी शेवाळे यांची 2021 चा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड नुकतीच करण्यात आली असून, रविवार दिनांक २७ रोजी दुपारी बारा वाजता नांदेड शहरातील कुसुम सभागृहात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर घुगे, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सौ.बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत योगदान दिल्यामुळे श्री गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने स्वर्गीय सुभाषराव पाटील चिखलीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात आला असून, शिक्षक शिवाजी शेवाळे यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तालुकास्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त असलेले शिक्षक शिवाजी शेवाळे हे संगीताचे प्रचंड चाहते आहेत. कोरोना काळात त्यांनी अनेक गीते सादर करून लोकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती केली होती. त्याबद्दल त्यांना अनेक ऑनलाइन पुरस्कार देखील मिळाले आहेत. गेल्या 32 वर्षापासून ते ज्ञानदानाचे काम करत आहेत. नायगाव तालुक्यातील अवघड क्षेत्रात देखील त्यांनी आपली सेवा चोख बजावली.आजघडीला त्यांचे विद्यार्थी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.

बालपणापासूनच सांगीतिक आणि अभिनयाची कला अंगी असलेले शेवाळे यांनी शाळेतही मुलांना धडे गिरवताना अभिनयासह संगीत कौशल्याचा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची एक वेगळी रूची तयार केली. वडेपुरी येथील माता रत्नेश्वरीवर आधारित एका गाण्यात त्यांनी अभिनयाचं काम केलं आहे ते संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध आहे. शिवाय काही मराठी चित्रपटात देखील त्यांनी आपली कला सादर केली आहे. शिक्षकी पेशा असला तरी अंगात सर्वगुण संपन्न कला भिनलेल्या एका होतकरू शिक्षकाला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळणे ही खरच न्यायिक बाब असल्याची भावना त्यांच्या सहकारी शिक्षक मित्रांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळींसह त्यांच्या हितचिंतकांनी शिवाजी शेवाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.