लोह्यातील महिलेच्या खून प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळास भेट देवून तपासाचा घेतला आढावा

568
प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेड.

मागील दोन महिन्यांपूर्वी नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील शनी मंदिरात झोपलेल्या भोळसर स्वभावाच्या महिलेचा अज्ञात आरोपीने गळा चिरून निर्दयी हत्या केली होती. सदर घटनेच्या तपासात लोहा पोलिसांना अद्यापपर्यंत यश आले नसल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दि.11 रोजी लोहा पोलीस ठाण्यात भेट दिली व संपूर्ण तपासाचा आढावा घेवून तपास गतिमान करण्याच्या सूचना पो. नि.संतोष तांबे यांना दिल्या.

डिसेंबर महिन्यातील 7 रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास लोहा शहरातील शनी मंदिरात झोपलेल्या भोळसर स्वभावाच्या छबुबाई गोविंदसिंग ठाकूर (वय 60) रा.गवळी गल्ली, लोहा या महिलेचा अज्ञात आरोपीने मंदिरात कुणीही नसल्याची संधी साधून धारदार शस्त्राने गळा चिरून निर्दयी हत्या केली होती. याप्रकरणी मयत महिलेचे नातेवाईक रामसिंग गोपालसिंग ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहा पोलिसात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मात्र सदरील घटनेस दोन महिने उलटून गेल्यानंतरही लोहा पोलीस अद्याप त्या महिलेच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचले नसल्यामुळे खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दि. 11 फेब्रुवारी रोजी लोहा पोलीस ठाण्यास भेट देवून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच घटनास्थळास भेट दिली. सदर खून प्रकरणाचा तपास गतिमान करण्याच्या सूचनाही पो.नि.संतोष तांबे यांना पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी दिल्या. यावेळी सपोनी.रवींद्र क-हे, गफार शेख, पोउपनि. मारोती सोनकांबळे, रेखा काळे सह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.