नांदेड रेल्वे स्थानकातील खळबळजनक घटना; तपोवन एक्सप्रेसच्या डब्यातील खिडकीला बाहेरून गळफास घेऊन एकाची आत्महत्या

2,050

नांदेड-

नांदेडच्या हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस या रेल्वे गाडीच्या डब्याला बाहेरच्या बाजूने खिडकीला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दि.30 मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नांदेडहून तपोवन एक्सप्रेस ही रेल्वेगाडी मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर गाडी उभी होती.या गाडीच्या एका डब्यातील शौचालयाच्या बाहेरील बाजूने खिडकीला मोठ्या रुमालाने गळफास घेऊन एका 25 वर्षीय अज्ञात युवकाने आत्महत्या केली. ही माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी रेल्वे प्रशासनाने कळविली.उनवणे यांच्या सुचनेवरून महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावल्या. मृतदेह खाली उतरून रितसर पंचनामा करून तपासणी केली असता अज्ञात मृत तरुणाकडे ओळख पटविण्यासाठी कुठलेच ओळखीचे पुरावे आढळले नाही.पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, अज्ञात मयताचा रंग सावळा, गोल चेहरा, उंची साडेपाच फूट, दाढीमिशी बारीक, केस काळे, सडपातळ बांधा, अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट असे पेहराव वर्णन आहे.पहिल्यांदाच अशाप्रकारे रेल्वेला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मयत कुणाचा परिचित किंवा जर कुणाचा नातेवाईक असेल तर लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी केले आहे. सदर तरुणाचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.