पुलाच्या अपूर्ण कामामुळे ट्रॅक्टर गेला खड्ड्यात..! सुदैवाने चालक बालंबाल बचावला; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला
नायगाव, नांदेड |
नायगाव तालुक्यातील बरबडा येथे ट्रॅक्टरचे अख्खे हेड पुलावर असलेल्या एका मोठ्या खड्डयात गेल्याची घटना दि.27 मंगळवार रोजी सकाळी घडली. यामद्धे ट्रॅक्टरच्या समोरील हेडचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून चालक बालंबाल बचावला आहे. दरम्यान, मंगळवारी या घटनेसह सकाळी देखील एक दुचाकीस्वार याच खड्डयात पडला होता. सुदैवाने गाडीचे थोडे फार नुकसान झाले असले तरी तो सुखरूप आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता येथील नागरिकांनी पाटबंधारे विभागावर संताप व्यक्त केला आहे.
बरबडा गावाशेजारी असलेल्या या नाल्यावर गोदावरी पाटबंधारे विभागाचा मंजूर झालेला एक पूल आहे. या पुलाचे गेल्या तीन वर्षापासून बांधकाम सुरू असून अद्यापही ते अपूर्णच आहे. बांधकाम होत असलेल्या नवीन पुलाशेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुमारे २० वर्षापूर्वीचा जुना पुल अतिशय खिळखिळा झाला असताना या विभागाने नवीन पुलाचे काम तातडीने केले नाही शिवाय जुन्या पुलाची तात्पुरती दुरुस्तीही केली नाही.
त्यामुळे गोदावरी नदीच वारंवार येणारे बॅकवॉटर हे या पुलावरून नेहमी वाहतच असते.
पुलावरून वाहणाऱ्या या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तब्बल वीस किलोमीटर दुरून वेढा घालावा लागतो. याचा खूप मोठा फटका बसून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.परिणामी कंटाळून या पुलावर भरपूर पाणी असले तरीही वीस किलोमीटरचे अंतर वाचविण्यासाठी अनेकजण जीव धोक्यात घालून याच पुलावरून ये-जा करतात.जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जुन्या पुलाचा अर्धा भाग कोसळून यामुळे पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा तयार झाला. हा खड्डा बॅकवाटरच्या पाण्यामुळे दिसत नाही. या खड्ड्यामुळे एखाद्याचा जीव जावू शकतो त्यामुळे या पुलाची डागडुजी करणे गरजेचे असताना पाटबंधारे विभाग एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
याविषयी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संजय चाकूरकर यांच्याशी संपर्क केला असता, यापुढे पुलावर पाणी राहणार नाही याची काळजी घेवू तसेच जुना पूल आमच्या विभागाअंतर्गत येत नाही तरी त्या खड्ड्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करू असे सांगितले आहे.
दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे दि.27 मंगळवारी मनुर येथील प्रल्हाद शिंदे नावाच्या एका ट्रॅक्टर चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अख्ख ट्रॅक्टर खड्ड्यात घातले मात्र, सुदैवाने तो यातून बचावला असला तरी पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा त्याला चांगलाच भोवला. पुलाचे हे काम तातडीने वेळेत झाले असते तर हा प्रसंग ओढवला नसता. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागावार तीव्र संताप व्यक्त केला आहे.