माहूर नगरपंचायत विषय समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध मात्र स्विकृत सदस्याची निवड लांबणीवर.!
काँग्रेसने दिला बंजारा समाजाला न्याय !
माहूर, नांदेड –
माहूर नगरपंचायतमध्ये विषय समिती सदस्य व सभापती निवड व स्वीकृत सदस्य (नगरसेवक) ची निवड प्रक्रिया दि.२१ रोजी माहूर नगरपंचायतच्या सभागृहात संपन्न झाली. सदरील निवडणुक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ७, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ६ तर शिवसेनेचे ३ सदस्य व भाजपा नगरसेवक सागर सुधीर महामुने यांनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना स्थायी समिती सभापती पद तर शिवसेनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना लाड यांची नियोजन व विकास समिती सभापती पदसिद्ध) म्हणुन निवड करण्यात आली. तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदी काँग्रेस पक्षाकडून सागर विक्रम राठोड, व सार्वजनिक बांधकाम समिति सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बिलकिस बेगम अहमद अली शेख, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी शिवसेनेचे विजय शामराव कामटकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पदी अशोक कचरु खडसे यांची निवड करण्यात आली परंतु संख्या बळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वाट्याला येणारे प्रत्येकी एक नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) पदासाठी दोन्ही काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने व जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याने दोन्ही काँग्रेसने नामनिर्देशित सदस्य निवड प्रक्रियेत सहभाग घेण्याचे टाळले आहे. स्वीकृत सदस्य पदाची निवड प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
सदर निवड प्रक्रियेत वाट्याला आलेले एकमेव महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद सर्वसामान्य बंजारा समाजातील महिला नगरसेविका सौ. सागर विक्रम राठोड यांना संधी देऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला न्याय दिल्याची प्रतिक्रिया देत बंजारा समाजाच्या नागरिकांनी सौ.सागर राठोड यांचे अभिनंदन करून पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, काँग्रेस तालुकाध्यक्ष जि.प.सदस्य संजय राठोड, विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसन राठोड सह काँग्रेसच्या नेत्यांचे प्रत्यक्ष व समाजमाध्यमांव्दारे आभार मानले आहे.