शासकीय जागेतील अतिक्रमण प्रकरण भोवले !  उपसरपंचासह दोन सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; लोहा तालुक्यातील धानोरा (म) येथील प्रकार

377

प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेड –

तालुक्यातील धानोरा (म) येथे तीन विद्यमान उसरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्यांनी विविध ठिकाणी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने सदर सदस्यांचे सदस्यत्व उर्वरित कालावधीसाठी रद्द केल्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.

लोहा तालुक्यातील धानोरा (म) येथील ग्रामपंचायत मधील विद्यमान उपसरपंच आणि दोन सदस्यांनी विविध ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य अंकुश राठोड, कांताबाई गायखर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. सदरील तक्रार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी विशेष पथकामार्फत करण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकारी व बांधकाम विभागातील शाखा अभियंता यांच्या पथकाने प्रत्यक्ष गावात जाऊन पंचायत समक्ष चौकशी केली असता तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा रस्ता क्रमांक २८ वर विविध ठिकाणी मालमत्ता क्रमांक (नऊ ५६४, ५७८, ६६५) अतिक्रमण केल्याचे दिसून आल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.

सदरील प्रकरणा संदर्भात जिल्हाधिकारी यांनी धानोरा (म) येथील दोन्हीकडील वादी व प्रतीवादीचे म्हणणे ऐकून घेऊन उपसरपंच यासंह अन्य दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केल्याचे आदेश निर्गमित केले. त्यामध्ये विद्यमान उपसरपंच सोमाबाई रमेश कदम, ग्रा.पं.सदस्य अच्युत एकनाथ बोंढारे व बालाजी यादू माटोरे यांचे सदस्यत्व उर्वरित कालावधीसाठी रद्द केल्याचा आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतेच निर्गमित केले. सदर प्रकरणामुळे तालुक्यातील अतिक्रमण धारक लोकप्रतिनिधींचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.