हदगावात रोड व नाली होण्यापूवीच अतिक्रमण बसले; गांव बसा भी नहीं, लुटेरे पहले पहूँच गये.

539

हदगाव, नांदेड –

नांदेड तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या हदगाव तामसा रोडवरील हदगाव शहरातील नालीचे काम सुरू आहे. अद्याप रोडच्या कामाला सुरुवातही झाली नाही परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशिर्वादाने टपरी व दुकानदारांनी नालीवर अतिक्रमण थाटले आहे. या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हदगाव शहरातून तामसा भोकर उमरी मार्गे लोहगाव रोडला जोडणाऱ्या महामार्गाचे काम हदगाव शहराजवळ सुरू आहे. रोडचे काम करण्यापूर्वी सध्या नालीचे बांधकाम सुरू असून नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग शहरालगत असल्यामुळे अगोदरच आजूबाजूच्या मालमत्ताधारकांनी व जिथे शासकीय मालमत्ता आहे तिथे टपरीधारकांनी अतिक्रमण थाटलेले होते. हे सर्व अतिक्रमण काढून त्या ठिकाणी नाली व रोडचे काम सुरू केलेले आहे. नालीचे काम काही ठिकाणी वादग्रस्त असून धनदांडग्यांच्या इमारतींना कायम ठेवून आणि बगल देत केलेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर लाचखोरीचे आरोप सुद्धा होत आहेत. मालमत्ता धारकाकडून काही रक्कम घेऊन त्यांचे अतिक्रमीत बांधकाम न पडता नालीचे बांधकाम केलेले आहे.

याबाबतीत काही दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता हे अतिक्रमण काढण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागून ऊपोषण थांबवले होते. परंतु पंधरा दिवसांनंतरही नालीच्या ठिकाणावर बांधलेले इमारतीचे अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे इतरही अतिक्रमणधारकांना जोर चढला आहे. नालीचे बांधकाम पूर्ण होण्याच्या अगोदरच अनेकांनी टपर्‍या टाकून आपले व्यवसाय सुद्धा सुरू केले आहेत. गरिबांना व्यवसायासाठी जागा दिली जावी, परंतु फुटपाथवर अतिक्रमण करून नव्हे तर स्वतंत्र व्यापार संकुल तयार करून शासनाने काही रक्कम घेऊन टपरी धारकांना बसवले पाहिजे. इथे मात्र चक्क फुटपाथवरच टपरी लावून अतिक्रमण केल्या जात आहे. फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे आणि त्याच्यापुढेही वाहने थांबत असल्यामुळे पादचाऱ्यांना थेट मुख्य रोडवरूनच पायी चालावे लागणार आहे. त्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकांचे जीव धोक्यात घालून चिरीमिरी कमावणाऱ्या अभियंत्यांना कोण संरक्षण देत आहे? किंवा कोणाचे पाठबळ आहे, हा प्रश्न सुद्धा येथे अधोरेखित होत आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागावर आणि उपअभियंता आणि संबंधित अभियंत्यावर निशाणा साधला जात आहे. “गांव बसा भी नही, लुटेरे पहिले पहूँच गये” या म्हणीप्रमाणे बांधकाम सुरू होण्याच्या अगोदरच त्याची फुटा, फुटाने संबंधित अभियंते विक्री करत आहेत. अतिक्रमण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे हदगाव बचाव समितीचे अध्यक्ष दत्तराव पाटील आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. अतिक्रमण नाही काढल्यास संपूर्ण नालीवर आमचे कार्यकर्ते अतिक्रमण करून आंदोलन करतील असा इशारा सुद्धा पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.