माजी नगरसेवकाने वाचविले वानराचे प्राण ; जुना लोह्यातील घटना

366
प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेेेड –

जुना लोहा शहरातील आंबेडकर नगर परिसरातील कलाल पेठ भागात सकाळी वानराचा विद्युत भार वाहक तारेला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून वानर गंभीर जखमी झाले. जखमी वानरास माजी नगरसेवकाने तात्काळ प्रथमोपचार दिल्यामुळे जखमी वानराचे प्राण वाचले. माजी नगरसेवक यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

उन्हाळा सुरू झाला असून ऊन तापत असताना उन्हाचे चटके आता बसण्यास सुरुवात झाली आहे. शिवारातील पानसाठे तळ गाठत आहेत. मुक्या वन्यजीवांना रानावनात खायला काही मिळत नसल्यामुळे वन्यजीव आता अन्न व पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत शिरकाव करत असतानाचे दिसून येत आहे. दि. 27 रोजी रविवारी जुन्या लोह्यातील कलालपेठ भागातील माजी नगरसेवक उत्तम महाबळे हे सकाळी घरासमोर उभे होते. तेवढ्यात मोठ्या संख्येने असलेल्या वानरांची एक टोळी परिसरातील घरांच्या छतावरून, पत्रावरून झाडांवरून इकडून तिकडे उड्या मारत होते. त्यातील एक वानर विद्युत भार वाहिकेच्या पोल वरती चढून मर्कट लीला करत होते. अचानक त्याचा विद्युत तारेशी संपर्क होऊन त्याला जबर शॉक लागला आणि ते क्षणात खाली असलेल्या नालीत कोसळले. तात्काळ बाजूस उभ्या असलेल्या लहान मुलांच्या मदतीने माजी नगरसेवक उत्तम महाबळे यांनी सदर वानरास नाली बाहेर काढून त्या गंभीर जखमी व शुद्ध हरवलेल्या वानरास मायेने जवळ घेत त्याच्या अंगावर उबदार व मऊ कापडाने स्वच्छ पुसून त्याची काही वेळ मसाज केली. थोड्यावेळाने ते शुध्दीवर आले.

त्यानंतर वानराने सदर ठिकाणाहून मनोमन आभार मानत तेथून धूम ठोकली आणि आपली वानरसेना गाठली. त्यास मिळालेल्या जीवदानमुळे तेथे उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. माजी नगरसेवकाने दाखविलेल्या मानुसकीचे दर्शनाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.