खळबळजनक ! राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी खोदून समाजकंटकांनी अस्थींसह अष्टधातूची पेटी केली लंपास; विश्वस्तांची अहमदपूर पोलिसांत तक्रार दाखल

समाधीस्थळ उकरल्याने पडला मोठा खड्डा..

2,059

लातूर |

अहमदपूर तालुक्‍यातील भक्तीस्थळ येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधीस्थळ खोदून महाराजांच्या अस्थींसह अष्टधातूंची पेटीच समाजकंटकांनी लंपास केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे समाधी स्थळी भला मोठा खड्डा पडला आहे. या घटनेमुळे लिंगायत समाजात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी वयाच्या 104 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. अहमदपूर तालुक्‍यातील भक्तीस्थळ येथे 2 सप्टेंबर 2022 रोजी शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी महाराजांची विधिवत समाधी बांधण्यात आली.मात्र दि.8 नोव्हेंबर 2022 रोजी समाधी स्थळाची विटंबना करून महाराजांच्या अस्थी ठेवलेली तीन बाय तीन आकाराची अष्टधातूची पेटी तसेच बांधलेली समाधी खोदून त्यावरील महादेवाची पिंडही समाजकंटकांनी पळवून नेल्याचा खळबळजनक आरोप भक्तीस्थळ विश्वस्त मंडळाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदपूरचे तहसीलदार तसेच अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

        विश्वस्तांनी पोलिसांत केलेली तक्रार 👆🏻

अहमदपूर तालुक्यातील भक्ती स्थळ येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधी स्थळाची विटंबना करण्याचा कट काही समाजकंटक करत असल्याची लेखी तक्रार दि.5 सप्टेंबर 2022 रोजी विश्वस्त मंडळाने एका निवेदनाद्वारे लातूरचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती.महाराजांच्या मृत्यूनंतरही त्याचे भांडवल करण्याचा कट काही समाजकंटक सातत्याने करीत आलेले आहेत.आता तर चक्क महाराजांची भक्ती स्थळावरील समाधी उकरून त्यातील अस्थी पळविण्याचा घाट काही समाजकंटकांनी रचला. त्यातून भक्ती स्थळावरील विद्यमान विश्वस्त मंडळाला बदनाम करण्याचा तसेच इतरत्र समाधी स्थळ बांधण्याचा घाट किंवा अस्थी चोरून नेऊन त्या भंग करायचे मनसुबे काही जण आखत असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली होती.

दरम्यान, हा कट उघडकीस आला असून समाधी उकरून समाधी स्थळाचे पावित्र्य भंग करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच अस्थी ठेवलेली अष्टधातूंची पेटी, त्यातील सर्व अस्थी, महादेवाची पिंड परत मिळवून भक्ती स्थळ व विश्वस्त मंडळाला संरक्षण देण्याची मागणी विश्वस्त मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर माधवराव अण्णाराव बरगे, सुभाष वैजनाथ सराफ, बब्रुवान देवराव हैबतपुरे, व्यंकटराव गंगाधरराव मुद्दे, शिवशंकर बळीराम मोरगे, संदीप लक्ष्मणअप्पा डाकुलगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे लिंगायत समाजाचे श्रद्धेचे स्थान होते. महाराजांचे देशभरात लाखो भाविक आहेत. त्यामुळे समाधीची अशा प्रकारे विटंबना होऊन अस्थी पळवून नेल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशसहित देशभरातील भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे.

समाजाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य घालवले होते. 25 फेब्रुवारी 1917 साली त्यांचा जन्म झाला होता. शिवाय त्यांनी लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवीही मिळवली होती आणि जिल्ह्यातील पहिले डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती.1932 साली विरमठ संस्थानाचे ते उत्तराधिकारी झाले होते. त्यांनी पहिल्यांदा श्रावण मास अनुष्ठान कपिलधार येथे केले होते. महाराष्ट्र, आंध्र, तेलंगण, कर्नाटक या प्रांतांत लाखोंचा भक्तसंप्रदाय महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानत असे.

आपल्या 104 वर्षांच्या आयुष्यात ते ताठ कण्याने जगले. त्यासाठीची योगसाधना ते नित्यनियमित करत. त्यांच्या चेहर्‍यावरील तेज थक्क करणारे होते व भाषेवरील प्रभुत्व कोणालाही अचंबित करणारे होते. मराठी, कन्नड, संस्कृत, हिंदी, इंग्लिश, उर्दू व पंजाबी अशा सहा भाषांतून ते प्रभावीपणे आपले विचार मांडत असत.आपल्या कोणत्याही भक्ताचे निमंत्रण त्यांनी कधीही नाकारले नाही. तेवढ्याच आत्मीयतेने ते आपल्या सर्व भक्तांकडे जात असत.

Leave A Reply

Your email address will not be published.