खळबळजनक ! नांदेडमद्धे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचा सुळसुळाट; चक्क ऑटो चालकाकडे आढळले पिस्तुल

4,459

नांदेड –

शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात घातक शस्त्र जप्त करण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू आहे. त्यामध्ये पिस्तुल, तलवारी, खंजर असे घातक शस्त्रास्त्र हे आरोपींकडून सतत बाळगले जात असताना शहरातील जुना कौठा भागातील मामा चौक येथे एका ऑटो चालकाकडे पोलिसांना गावठी पिस्तुल आढळून आली आहे. पोलिसांनी हे पिस्तुल जप्त करून ऑटो चालकास अटक केली आहे.

नांदेड शहरात महिन्याभरा पूर्वी म्हणजे दि.5 एप्रिल रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत जवळपास 50 हुन अधिक आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामद्धे गावठी पिस्तुल, तलवारी, खंजर अशा शस्त्रांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस हवालदार प्रमोद कराळे हे गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली जुना कौठा येथील मामा चौक येथे संशयित ज्ञानेश्वर नरहरी पुंड, वय 35 रा. आदित्य चायनीज समोर, जुना कौठा याला ताब्यात घेतले असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रमोद कराळे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ऑटोचालक ज्ञानेश्वर पुंडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे करीत आहेत.

दरम्यान, नांदेड शहरात अवैधपणे शस्त्र बाळगणाऱ्यांचा सुळसुळाट सुरू असून दररोज शहरात शस्त्र सापडत आहेत. शेजारील राज्यात काही हजारांत ही पिस्तूल मिळत असल्यामुळे पिस्तूल बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

शहरात त्यामुळे क्षुल्लक कारणावरून देखील झालेल्या भांडणात पिस्तूल काढण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.त्यामुळे अवैधपणे पिस्तुल बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पण, सध्यातरी पोलिस या पिस्तुल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे पोलिसांवर गोळीबार करण्यापर्यंत आरोपींची मजल जाऊ लागली आहे. अवैधपणे पिस्तुल बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय आणि पिस्तूलच्या मूळापर्यंत पोहचल्याशिवाय गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणार नाही. नेमके तिथेच पोलिस कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.