कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा- प्रल्हाद इंगोले

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

446

अर्धापूर, नांदेड –

शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी शेतकऱ्यांनाच मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले यांनी
केली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, त्यांच्या पैशाची सुरक्षितता राहावी तसेच शेतकरी व व्यापारी यांना सोयीचे व्हावे यासाठी शेतमाल खरेदी विक्रीसाठी स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार युती सरकारने दिला होता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तो अधिकार कमी करण्यात आला त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

ज्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही व्यवस्था निर्माण केली त्या शेतकऱ्यांनाच मतदानाचा अधिकार नसणे ही आश्चर्याची बाब आहे. सोसायटी मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ याठिकाणी प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य, संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्याने निवडणुकात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी मार्केट कमिट्या राजकारणाचे अड्डे बनत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष होऊन कृषी उत्पन्न बाजार समित्या या आपल्यासाठी आहेत असं शेतकऱ्यांना वाटत सुद्धा नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकासाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारी शेतकऱ्यांसाठी काम करणारे शेती प्रश्नांची उकल करणारे शेतकरी प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जातील व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी निवडलेले प्रतिनिधी असतील.

सरकारने शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला तर महाराष्ट्रातील शेतकरी या निर्णयाचे स्वागत करतील त्यामुळे या मागणीचा विचार करून शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.