नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोर माजी जवान पोलिसांच्या ताब्यात

2,093

नांदेड-

घर बांधकामाच्या परवानगीस अडवणूक करीत असल्याच्या कारणावरुन मुखेड येथील माजी नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी बाबुराव देबडवार यांच्यावर सीआरपीएफच्या एका माजी जवानाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

मुखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा तथा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी बाबुराव देबडवार हे दि.2 डिसेंबर रोजी बसस्थानकासमोरील आपल्या दुकानात बसले होते.यावेळी तेथे आलेल्या सीआरपीएफमधील माजी जवान गजानन विश्वनाथ मदनवाड याने दुकानात येऊन देबडवार यांना उद्देशून ‘तू माझ्या घराचे बांधकाम का अडवतोस? माझ्या विरोधात पोलीस तक्रार का दिलीस’ असा जाब विचारला आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्याच दुकानातील लोखंडी फावडे व लाकडी दांड्याने देबडवार यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला.

या जबर मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दुकानातील दोन कर्मचा-यांनाही मार लागला असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान, पोलिसांनी आरोपी गजानन विश्वनाथ मदनवाड यांना ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात कलम 307,324, 504, 506 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर बसस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती. तर रुग्णालयामध्ये कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी धाव घेतली. सदर हल्ल्यामागे घर बांधकामाच्या परवानगीस अडवणूक केल्याचे कारण आहे की अन्य कोणते कारण आहे का ? या दिशेने देखील पोलीस तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.