सासरहून लेकीला माहेरी आणताना दुचाकी अपघातात बाप – लेकीचा दुर्दैवी अंत
कंधार, नांदेड –
सासरहून लेकीला माहेरी आणण्यासाठी गेलेल्या बापासह लेकीचा दुचाकी अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची घटना उदगीर-जांब रोडवर पाटोदा (खु.) फाट्याजवळ घडली़. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली़ असून या घटनेमुळे सोमासवाडीसह फुलवळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सोमासवाडी येथील रहीवासी बालाजी उर्फ बाळू किशनराव रासवते, वय 42 वर्षे हे लेक राजश्री राजेश श्रीमंगले (लहानकर) वय 22 वर्षे हिस माहेरी आणण्यासाठी दि.2 जानेवारीला सासर असलेल्या उदगीर येथे गेले होते़.आपल्या लेकीला आपल्या दुचाकीवरून उदगीरवरून जळकोट जांब मार्गे फुलवळकडे येत असतांना रात्री 10 च्या सुमारास जळकोट पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटोदा (खू.) पाटीजवळ त्यांच्या दुचाकीचा जबर अपघात झाला.यात बापासह लेकीचा दुचाकी अपघातात दुर्दैवी अंत झाला़.
सदरच्या अपघाताची नोंद जळकोट पोलीस स्टेशनला करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पी.बी.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.चिमंदरे हे करत आहेत. बालाजी रासवते यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोमासवाडीसह फुलवळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.