सततच्या नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

877

नांदेड-

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धम्मपाल थोरात असे मयत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे सरसम गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तरी देखील अनेक शेतकऱ्यांनी रब्बीसाठी भरपुर मेहनत केली, मात्र ऐन पिकाच्या मोसमात वादळी वाऱ्याने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे अक्षरशः कंबरडे मोडले.

दरम्यान, असाच अनुभव हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील शेतकऱ्यास आला आहे. यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेने तरुण शेतकरी धम्मपाल सखाराम थोरात वय, ३२ वर्ष या शेतकऱ्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले आहे.

ऐन खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना या तरुण शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. मागील काळात शेतीसाठी बँकेकडून घेतलेले कर्जाची परतफेड झाली नसल्याने यंदा कृषी कर्ज मिळण्याची आशा धूसर झाली होती. त्यामुळे यंदा पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी सतत चिंतामग्न राहत होता. याच विवंचनेतून धम्मपाल सखाराम थोरात यांनी आपले शेत सर्वे क्रमांक 214/2 मधील आंब्याच्या झाडाला आज दि.6 जून रोजी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत युवा शेतकऱ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. शेतकऱ्याच्या कुटुंबाना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून तातडीने मदतीचा हात देण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.