अखेर ठरलं..! अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ ट्विटने राजकीय वारस निश्चित; पदयात्रा राहुल गांधींची चर्चा मात्र चव्हाण कन्येची..
नांदेड |
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री 9 वाजता देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली. प्रचंड फटाक्यांची आतिषबाजीसह राहुल गांधींच्या या यात्रेचे महाराष्ट्रात अभुतपूर्व असे स्वागत करण्यात आले. राहूल गांधी यांनी देगलूरमध्ये दाखल होताच हजारो कार्यकर्ते हातात मशाली घेत पदयात्रा काढत भारत जोडो यात्रेत सामील झाले.
या यात्रेत काँग्रेसचे महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेते हजर होते.यावेळी चर्चेचा विषय ठरला, तो म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुपुत्री श्रीजया चव्हाण. राजकारणापासून अद्याप लांब राहिलेल्या श्रीजया चव्हाणांचे भारत जोडो यात्रेत पोस्टर्स झळकले आहेत. त्यामुळे आता श्रीजया चव्हाण या राजकारणात एन्ट्री करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
दरम्यान, दि. 8 मंगळवार रोजी सकाळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया या देखील राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या.भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी देगलूर आणि यात्रेच्या मार्गावर लावण्यात आलेल्या होर्डिंगजवर देखील श्रीजया यांचे फोटो लागले आहेत. त्यामुळे भारत जोडोच्या निमित्ताने श्रीजया यांची राजकारणात एन्ट्री होत आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांच्या राजकीय वारसदाराची जणू घोषणाच केली आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे धाकटी कन्या श्रीजया त्यांचा लोकसेवेचा वारसा चालवेल, हे आता स्पष्ट झाले आहे.
अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. चालता-चालता तिने खा.राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यांच्या या भेटीचा व्हीडीओ वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांनी एक ट्विट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर जणू शिक्कामोर्तबच केले.
आपल्या ट्विटमध्ये चव्हाण म्हणतात, “पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार.” या ट्विटमधील पाखराच्या पिल्लाने आभाळात झेप घेण्याचा संदर्भ श्रीजयाच्या राजकीय प्रवेशाची घोषणा असल्याचे स्पष्ट आहे.
मागील अनेक महिन्यांपासून श्रीजया अशोक चव्हाण यांच्या राजकारणातील पदार्पणाची चर्चा सुरू होती. कायद्याची पदवी संपादन केलेली श्रीजया गेल्या काही काळापासून वडिलांच्या ‘बॅक ऑफिस’ची जबाबदारी सांभाळते आहे.अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमांचे नियोजन, जनसंपर्क आदी बाबींवर ती लक्ष ठेवते. मात्र, आजपर्यंत निवडणूक प्रचार वगळता तिने स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले होते.
भारत जोडो यात्रा जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आयोजनामध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. यात्रेच्या स्वागतार्थ झळकलेल्या जाहिराती व फलकांमध्येही त्यांची छायाचित्रे होती. साहजिकच भारत जोडो यात्रेतून त्यांचा राजकारणातील प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते व ती चर्चा आज अशोक चव्हाण यांच्या ट्विटमुळे खरी ठरली आहे.
2019 पासून राजकारणात सक्रिय..
श्रीजया चव्हाण या काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्या नात आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक आणि माजी आमदार अमिता चव्हाण यांच्या त्या कन्या आहे. अशोक चव्हाणांना दोन जुळ्या मुली आहेत.त्यात श्रीजया यांना राजकारणात विशेष रस आहे.त्यांचे ‘एलएलएम’पर्यंत मुंबईत शिक्षण झाले आहे. यापूर्वी त्यांनी अनेकदा वडिलांच्या सभांना हजेरी लावली. विशेषतः 2019 मधल्या लोकसभा निवडणुकीत श्रीजया यांनी अशोकरावांचा जोरदार प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.
भारत जोडो यात्रेतून राजकारणात प्रवेश..!
लोकसभेच्या पराभवानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीजया यांनी अशोकरावांच्या प्रचारासाठी पुन्हा कंबर कसली. प्रचारात लक्ष घालत जनसंपर्कापासून साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. या निवडणुकीत चव्हाणांनी बाजी मारली. आता भारत जोडो यात्रेतून त्या राजकारणात उतरल्या असल्याच्या चर्चा वेग धरत आहे.
भारत जोडो यात्रेतल्या एन्ट्रीनंतर श्रीजया आपली नवी राजकीय वाटचाल सुरू करणार आहेत. खरंतर, यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांनीही राजकारणात प्रवेश केला होता. परंतु, पाच वर्षांच्या आमदारकीनंतर त्यांनी राजकारणापासून दूर राहणे पसंत केले. त्यानंतर आता श्रीजया यांच्या रूपाने चव्हाण कुटुंबातील दुसरी महिला आणि त्यांची तिसरी पिढी राजकारणात येईल.