अखेर नांदेडला जिल्हाधिकारी मिळाले..! जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेडला बदली
डॉ.विपीन इटनकर यांची बदली झाल्याने जिल्हाधिकारीपद होते रिक्त
नांदेड –
जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. यासंबंधीचा आदेश राज्याचे प्रधान सचिव (सेवा) डॉ. राजगोपाल देवरा यांनी गुरुवारी जारी केला. नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची 18 ऑगस्ट रोजी नागपुरला बदली झाल्याने ही जागा रिक्त होती. योगायोग म्हणजे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती होताच आता जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांची नांदेडला बदली करण्यात आली.
नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी आपल्या प्रशासकीय कामाचा ठसा जिल्ह्यात उमटविला होता. सर्वसामान्यात एक वेगळीच प्रतिमा त्यांनी निर्माण केली होती. मात्र, त्यांची नागपुरला बदली झाल्यानंतर नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कोणाची नेमणूक होणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या.नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची नागपुरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली तेव्हापासून जिल्हाधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. गुरुवारी रात्री उशिरा निघालेल्या आदेशानुसार नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत हे 2013 चे आयएएस अधिकारी आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री घोषित केले. त्यात जळगावचे नेते तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नांदेड, लातूर व धुळ्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. महाजन पालकमंत्री होताच नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली करण्यात आली. यासंबंधी सामान्य प्रशासन विभागाने गुरुवार, दि. 29 सप्टेंबर रोजी आदेश जारी केला आहे. त्यामळे तब्बल दीड महिन्यानंतर नांदेडला अखेर जिल्हाधिकारी मिळाले आहे.