अखेर तारीख ठरली.! राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’त शरद पवार, आदित्य ठाकरे 11 नोव्हेंबरला सहभागी होणार
नांदेड –
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज दि.9 बुधवारी महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. या यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे 11 नोव्हेंबर रोजी सहभागी होणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उद्या दि.10 यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सोमवारी देगलूर येथून सुरू झाला होता. या यात्रेतील भारतयात्रींमध्ये विविध राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भारत जोडो यात्रेचा साडेतीन हजार किलोमीटर अंतराचा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंतचा प्रवास आहे.
भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार रजनीताई पाटील, खासदार कुमार केतकर, आमदार विश्वजित कदम, आमदार सतेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे आदींसह अनेक नेत्यांचा सहभाग आहे.तर वन्नाळी येथून श्रीजया चव्हाण या पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण अशातही शरद पवार यांनी शिर्डी सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली.एवढचं नव्हे शरद पवार यांनी हेलिकॉप्टरने शिर्डीला जाऊन शिबिराला संबोधित देखील केले. यानंतर शरद पवार हे पुन्हा उपचारासाठी ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते.
शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता शरद पवार हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत, हे आता स्पष्ट झालं आहे. शरद पवार हे 11 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील पदयात्रेत सहभागी होणार आहेत.