माहुरात गावठी पिस्तुलासह चारचाकी वाहन जप्त; अल्पवयीन मुलासह दोघांना अटक
नांदेड –
जिल्ह्यातील माहूर तालुक्यात एका अल्पवयीन बालकासह दोन जणांना सिंदखेड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा:
●नांदेडच्या दत्तनगर भागातील ‘फायनान्स’ चालकाकडे आढळला शस्त्रसाठा, 8 तलवारीसह खंजर व गुप्ती केले जप्त
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस अंमलदार हकीमखान सुलेमानखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात दि.7 मे रोजी रात्री सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस अंमलदार सोनसळे व नंदगावे हे गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका चारचाकी गाडीत पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलीस पथकाने अंजनखेड पुलाजवळ चारचाकी गाडी क्रमांक एमएच 20 सीएस 370 या क्रमांकाच्या गाडीला थांबवून तपासणी केली असता त्यात एक गावठी पिस्तुल सापडले. या गाडीत शेख मोहसिन शेख सुलेमान वय 23 रा.दत्तनगर, माहूर याच्यासह एका अल्पवयीन बालकास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले आहे.